झाडू निर्मात्यांना दिवाळीतच मिळतो रोजगार
By Admin | Updated: October 28, 2016 01:37 IST2016-10-28T01:37:06+5:302016-10-28T01:37:06+5:30
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गृहिणी नवनवीन प्रकारच्या हायटेक वस्तूंना प्राधान्य देतात. असे असले तरी दिवाळी सणासाठी सिंधीच्या पानांपासून

झाडू निर्मात्यांना दिवाळीतच मिळतो रोजगार
सिंदीच्या पानांपासून फड्यांची निर्मिती
वर्धा : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गृहिणी नवनवीन प्रकारच्या हायटेक वस्तूंना प्राधान्य देतात. असे असले तरी दिवाळी सणासाठी सिंधीच्या पानांपासून तयार होणारा फडा आणि केरसुनी खरेदीला प्राधान्य दिले जाते. लक्ष्मीपूजनाला या झाडूला मोठा मान असतो. झाडूला लक्ष्मी समजले जाते. सिंधीच्या पानांपासून झाडू निर्माण करणाऱ्या नागरिकांनाही दिवाळीतच रोजगार उपलब्ध होत असल्याचे दिसते.
श्रीमंतांपासून तर झोपडीतील गरीबांपर्यंत सर्व दिवाळीत ही केरसुनी आवर्जून खरेदी करतात. यामुळे दिवाळी पर्वात केरसुनीला मोठी मागणी असते. याच काळात कारागिरांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो. इतर वेळी या झाडूला कुणी विचारत नसल्याने कारागिरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असतो. झाडू ही रोजच उपयोगात येणारी वस्तू असल्याने घरोघरी ती दिसून येते. सध्या आधुनिक विविध प्रकारच्या झाडंूनी आपली छाप ग्राहकांवर पाडली आहे. शिवाय बाजारपेठही काबीज केली आहे. यामुळे पूर्वी घरात दिसणारे फडे, केरसुणीचे महत्त्व कमी होत चालले आहे. परिणामी, ग्रामीण कारागिरांवर संक्रांत आली आहे. पूर्वी सिंधीच्या झाडाच्या पानांपासून ग्रामीण भागातील कारागिर झाडू (फडा) तयार करीत होते. सिंधीच्या पानोळ्यापासून झाडू बनविण्याचा व्यवसाय कित्येक पिढ्यांपासून सुरू होतो; पण सध्या झाडू बनिवण्यासाठी सिंधीची झाडेही क्वचितच दिसतात. झाडे कमी झाल्याने पानोळ्या मिळणे दुरापास्त झाले आहे. फड्यांना ग्रामीण भागात आजही महत्त्व असले तरी सिंधीच्या झाडांची संख्या कमी असल्याने हा व्यवसाय करणारे आता बोटावर मोजण्याइतके राहिले आहेत. यामुळे हा व्यवसाय अरेखच्या घटका मोजत आहे. परिणामी अशा कारागिरावर उपासमारीची वेळ आली आहे.
पूर्वी हा व्यवसाय गृहउद्योग म्हणून ओळखला जाता होता. बहुतांश गावातील कारागिर हा व्यवसाय स्वावलंबी व्यवसाय म्हणून करीत होते; पण आता या व्यवसायाकडे शासनाकडूनही दुर्लक्ष होत असल्याने घराघरात आढळणारी व लक्ष्मी म्हणून ओळखली जाणारा फडा आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. फडा घरात आणल्यानंतर आजही ग्रामीण भागात हळद-कुंकू लावून त्याची पूजा करण्याची परंपरा कायम आहे. फड्याला म्हणूनच लक्ष्मी मानले जाते. केवळ दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी फडा खरेदी करण्यात येतो. इतर दिवसांसाठी आधुनिक झाडूंचा वापर केला जात असल्याने या व्यवसायावर अवकळा आल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येते.(कार्यालय प्रतिनिधी)