कपाशीवर बोंडअळीचा ‘अटॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:25+5:30

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात यंदा एकूण २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड झाली. यात कोरडवाहू शेतजमिनीचाही समावेश आहे. सुरूवातीला बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर थोड्या प्रमाणात दिसून आला. त्यावेळी कृषी विभागाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने काही प्रमाणात बोंडअळीला अटकाव घालता आला.

Bondage Attack on Cotton | कपाशीवर बोंडअळीचा ‘अटॅक’

कपाशीवर बोंडअळीचा ‘अटॅक’

ठळक मुद्देकृषी विभागाच्या दुर्लक्षित धोरणांचा कपाशी उत्पादकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी सोयाबीनला बगल देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करण्यास पसंती दर्शविली. परंतु, सध्या गुलाबी बोंडअळी पुन्हा नव्या जोमाने डोकेवर काढू पाहत आहे. या प्रकाराकडे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असलेला कृषी विभागच दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याने कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्यातील काही भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असून यंदा पांढºया सोन्यापेक्षा बोंडअळीचेच जास्त उत्पन्न होईल काय, असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात यंदा एकूण २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड झाली. यात कोरडवाहू शेतजमिनीचाही समावेश आहे. सुरूवातीला बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर थोड्या प्रमाणात दिसून आला. त्यावेळी कृषी विभागाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने काही प्रमाणात बोंडअळीला अटकाव घालता आला.
मात्र, त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी सूस्त झाले. शिवाय त्यांनी उंटावरूनच शेळ्या हाकण्यात धन्यता मानल्याने सध्या बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कपाशी पिकावर दिसून येत आहे. शासकीय आकडेवारीनुसार आर्वी तालुक्यातील बाजारवाडा व रसुलाबाद, देवळी तालुक्यातील एकपाळा, समुद्रपूर तालुक्यातील वायगाव येथे बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे सांगण्यात येते.
असे असले तरी हिंगणघाट, वर्धा, समुद्रपूर, देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू तालुक्यांमधील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे शेतकरी सांगतात; पण शासनदरबारी याची नोंदच घेण्यात आलेली नाही. कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारीही कार्यालयातच बसून गाढा हाकत असल्याने ही विदारक परिस्थिती ओढावल्याची खंत शेतकºयांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. एकूणच कृषी विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा आर्थिक फटकाच यंदा कपाशी उत्पादक शेतकºयांना सहन करावा लागत आहे.

जनजागृतीचा अभाव, तज्ज्ञ उंटावरून हाकताहेत शेळ्या
दोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा उद्रेकच झाला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जिनिंग प्रेसिंग व्यावसायिकांची कानउघाडणीच केली होती. त्यानंतर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेनंतर बोंडअळीला अटकाव घालण्यात बऱ्यापैकी यश आले होते; पण त्यानतर जनजागृतीकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याचे दिसून येते.

जनावरांना दिला जातोय चारा
बोंडअळीच्या प्रादुर्भावाला कंटाळून शेतकरी थेट कपाशीचे पीक कापत आहेत. इतकेच नव्हे, तर कापलेले पीक किंवा कपाशी पीक असलेल्या शेतात शेतकरी आपली जनावरे चरण्यासाठी सोडत आहेत.

शेतकरी कापताय झाडं
शेतकऱ्यांनी योग्य निगा घेतल्याने कपाशी पिकाची समाधानकारक वाढ झाली. बहरलेली कपाशी पाहून यंदा विक्रमी उत्पन्न होईल, असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविला जात होता. सद्यस्थितीत कपाशीच्या एका झाडाला सुमारे ४० ते ५० बोंड असल्याचे बघावयास मिळत असून या बोंडामध्ये गुलाबी बोंडअळी आढळून येत आहे. त्यामुळे काही शेतकरी कपाशीचे झाडच कापण्यात धन्यता मानत आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावाला कंटाळून आर्वी तालुक्यातील रसुलाबाद येथील शेतकरी अजय आसोले यांनी कपाशी पीक थेट कापले आहे. तर याच गावातील प्रमोद गुल्हाणे, गजानन सावरकर, किशोर टाके हे शेतकरी कपाशीचे पीक कापण्याच्या तयारीत आहेत. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील आठही तालुक्यात असल्याचे वास्तव आहे.

Web Title: Bondage Attack on Cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती