बोंड अळीने कापूस फुटलाच नाही; उत्पादनही घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:22 IST2017-12-15T23:22:26+5:302017-12-15T23:22:43+5:30
यंदाच्या खरीप हंगामात बोंडअळीने शेतकऱ्यांच्या कपाशीवर हल्ला चढविला. याचा थेट परिणाम कापसाच्या उत्पन्नावर झाला. या आठ दिवसांपासून बाजारात कापसाची आवक मंदावल्याचे चित्र आहे.

बोंड अळीने कापूस फुटलाच नाही; उत्पादनही घटले
सुरेद्र डाफ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : यंदाच्या खरीप हंगामात बोंडअळीने शेतकऱ्यांच्या कपाशीवर हल्ला चढविला. याचा थेट परिणाम कापसाच्या उत्पन्नावर झाला. या आठ दिवसांपासून बाजारात कापसाची आवक मंदावल्याचे चित्र आहे.
आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत आर्वी तालुक्यात आर्वी, रोहणा व खरांगणा हे तीन कापूस संकलन केंद्रे आहे. आर्वी कापूस केंद्रावर गत वर्षीच्या कापूस हंगामात ११ डिसेंबर २०१६ पर्यंत ९५८७५.५५ क्विंटल कपासाची आवक झाली. रोहणा येथे ४२२१.८१ क्विंटल तर खरांगणा येथे १५३७४.२७ क्विंटल कापसाची आवक झाली. यावर्षी मात्र यात घट झाल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत आर्वी उपबाजारात ७५९७८.२५ क्ंिवटलची आवक झाली. रोहणा १९२१४.४९ क्विंटल तर खरांगणा येथे ९००६.३३ क्विंटल कापसाची आवक झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत ही आवक कमी असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. गत पंधरा ते वीस दिवसांपासून बोंडअळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याने कपाशीचे बोंड फुटतच नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. येत्या महिन्याभऱ्यात कापसाची उलगंवाडी होण्याचे संकेत आहेत. केवळ पंचनामे व्हायचे असल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशी पीक शेतात ठेवले आहे. कपाशीवर लाख रुपये खर्च करून शेतकºयांच्या हाती काहीच आले नाही.
आर्वी ही कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते. आर्वीत दहा ते बारा जिनींग आहे. या सर्व जिनिंग प्रेसींगवर आर्वी व परिसरातील जवळपास १५०० ते २००० कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यावेळी बोंडअळीच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या प्रादुर्भावाने कापसाची जिनींग पे्रसींगची आवक घटल्याने याचा थेट परिणाम या जिनींग प्रेसींगमध्ये काम करणाºया कामगारावर येणार आहे. त्यांच्यावरही उपासमारीचे संकट कोसळणार असल्याचे चित्र आहे. एकूणच या बोंडअळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून त्याला तातडीने मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
आमच्या शेतातील कापूस किडक निघत असून कापूस बोंड लवकर फुटत नाही, परिणामी कापूस वेचणीला त्रास होत आहे. वेचणीचा खर्च वाढला आहे.
- भास्कर चौकोणे, कापूस उत्पादक शेतकरी दहेगाव (मु.) ता. आर्वी.
गत १५ दिवसांपासून कापसाच्या आवकात घट झाली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षीचा हंगाम लवकर संपणार असल्याचे चिन्ह आहेत.
- विनोद कोटेवार, प्रभारी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी.