वाकलेले वीज खांब तारांसह शेतात लोळले

By Admin | Updated: May 20, 2016 01:51 IST2016-05-20T01:51:30+5:302016-05-20T01:51:30+5:30

महावितरणने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे. अद्यापही हजारो शेतकऱ्यांच्या विद्युत जोडण्या प्रलंबित आहे.

The bolted power pillows in the field with waves | वाकलेले वीज खांब तारांसह शेतात लोळले

वाकलेले वीज खांब तारांसह शेतात लोळले

महावितरणचा गलथान कारभार : तक्रारी करूनही दुरूस्तीकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळा
वर्धा : महावितरणने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे. अद्यापही हजारो शेतकऱ्यांच्या विद्युत जोडण्या प्रलंबित आहे. शेतकरी चकरा मारत आहे; पण त्यांना जोडणी मिळत नाही. इतकेच नव्हे तर शेतात वीज खांब वाकल्याने तारा लोंबकळत असल्याची तक्रार दिल्यानंतर दीड महिन्यापर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही. परिणामी, ते वीज खांब तारांसह शेतात लोळले आहे. यामुळे मशागतीची कामे खोळंबली असून महावितरणला अद्यापही जाग आली नाही.
देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे दररोजच वितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचा प्रत्यय येतो. गावात विजेचा लपंडाव नित्याचा झाला आहे. महिन्यातून १५ दिवस गाव अंधारातच असते. याबाबत तक्रारी करूनही तोडगा निघाला नाही. परिणामी, काळोखातच खितपत जगावे लागत आहे. आता शेतकऱ्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गावातील शेतकरी विशाल खापर्डे यांच्या शेतातील वीज खांब वाकल्याने तारा लोंबकळत होत्या. या तारांमध्ये घर्षण होऊन शेतालगत काही भाग जळाला. यामुळे त्यांनी देवळी, वायगाव (नि.) व वर्धा येथे महावितरणच्या कार्यालयात तक्रारी केल्या; पण महिना लोटूनही महावितरणचे अधिकारी वा कर्मचारी शेताकडे फिरकले नाही. यामुळे शेतकऱ्यांनीच त्या तारांवरील विद्युत पुरवठा बंद केला. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद झाल्याने ओलिताअभावी शेतकऱ्यांची पिके वाळू लागली. इतकेच नव्हे तर रस्त्यालगत असलेले जनावरांचे पाण्याचे हौद विद्युत पुरवठ्याअभावी भरता येत नसल्याने गुरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेण्याची तसदी महावितरणने घेतली नाही.
सध्या वाकलेले वीज खांब शेतातच आडवे पडले आहेत. ताराही जमिनीवर लोळत आहेत. यामुळे शेताची मशागत कशी करावी, असा प्रश्न सदर शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. दीड महिन्यापासून मशागतीची कामे थांबली असून आता हंगाम तोंडावर आला आहे. महावितरणने शेतात पडलेले खांब उभे करून तारा व्यवस्थित कराव्यात, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

वर्धा-वायगाव मार्गावरील वीज खांबही वाकले
वर्धा : महावितरणने प्रत्येक कामे कंत्राटदारांमार्फत करण्याचे धोरण अंगिकारले आहेत. यात संबंधित कंत्राटदारावर नियंत्रण नसल्याने कामांचा दर्जा राखला जात नसल्याचे समोर येत आहे. थोड्याही वादळामध्ये विद्युत खांब वाकत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. वर्धा ते वायगाव मार्गावर बुधवारी विजेचा खांब रस्त्यावर वाकला. परिणामी, तारा लोंबकळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
विद्युत खांब उभारण्याचे काम महावितरण कंत्राटदारांकडून करून घेते. यात कंत्राटदार योग्यरित्या काम न करता मलिदा लाटत असल्याचेच समोर येत आहे. याच प्रकारामुळे वरवर गाडलेले खांब वाकत असून प्रसंगी जमिनीवर लोळत असल्याचे दिसून येते. प्रत्येक गावात वाकलेले विजेचे खांब आणि हात पूरेल एवढ्या अंतरावर आलेल्या तारा पाहावयास मिळते. या प्रकारामुळे धोका निर्माण झाला आहे.
बुधवारी वर्धा ते वायगाव मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेला विजेचा खांब वाकला. यामुळे ताराही लोंबकळल्या होत्या. परिणामी, काही काळ या मार्गावरील वाहतूक थांबली होती. तारा तुटण्याची भीती असल्याने वाहन चालकांना सांभाळूनच वाहने काढावी लागत होती. या मार्गावर खांब वाकणे व तारा लोंबकळण्याचा प्रकार नेहमीच पाहावयास मिळतो. वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The bolted power pillows in the field with waves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.