ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
By Admin | Updated: August 31, 2014 00:00 IST2014-08-31T00:00:07+5:302014-08-31T00:00:07+5:30
कुठल्याही वैद्यकीय शाखेची अधिकृत पदवी नसताना फिजीसियन व सर्जन, असे फलक लाऊन ग्रामीण भागात सर्रास वैद्यकीय व्यवसाय केला जात आहे. आरएमपी ते एमबीबीएस, अशा पदव्या

ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
पिंपळखुटा : कुठल्याही वैद्यकीय शाखेची अधिकृत पदवी नसताना फिजीसियन व सर्जन, असे फलक लाऊन ग्रामीण भागात सर्रास वैद्यकीय व्यवसाय केला जात आहे. आरएमपी ते एमबीबीएस, अशा पदव्या नावापूढे लिहून अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांचे ग्रामीण भागात नेटवर्क तयार झाल्याचे दिसते. तालुका तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. संबंधित डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
तालुक्यातील ग्रामीण, दुर्गम तसेच आदिवासी बहुल गावांत बोगस डॉक्टरांना उधानच आले आहे. ग्रामस्थांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेकांनी वैद्यकीय व्यवसाय थाटल्याचे दिसून येत आहे. हंगामाच्या दिवसांत दुर्गम भागातून रुग्णांना संकटकाळी आरोग्य उपचार केंद्रापर्यंत पोहोचता येत नाही. यात वेळही जातो. शिवाय ग्रामीण भागात साधनेही मिळत नाही. अशा वेळी हे डॉक्टर रुग्णाकडे जाऊन महागडे उपचार करतात; पण यामुळे रुग्णांना थेट मृत्यूच्या दारात उभे राहावे लागत असल्याचे अनेकांचे अनुभव आहेत. तालुक्यातील अशा डॉक्टरांच्या जीवघेण्या उपचारामुळे रुग्णांच्या जीवन-मरण्याचा प्रश्न निर्माण होतो; पण केवळ नाईलाज असल्याने उपचार करून घ्यावे लागतात. बरेचदा मलेरिया, महिला व पुरुषांतील नपुसंकत्व, स्त्रियांचे वंधत्व तसेच यंत्रणा उपलब्ध नसताना लहान बाळांचे लसीकरण करण्याचा उद्योगही हे डॉक्टर करताना दिसतात. वेळेवर होणारे उपचार व मिळणारी औषधी यामुळे रुग्णांना समाधान होत असल्याने रुग्ण याबाबत कधीच ओरड करीत नाही. गावोगावी आशा आरोग्य स्वयंसेविका उपलब्ध आहे; पण त्यांच्याकडे प्राथमिक उपचाराकरिता पूरेसा औषधी उपलब्ध राहत नाही. आशा गावातील आरोग्याबाबत संपर्कात राहात नसल्यानेही बोगस डॉक्टरांना संधी मिळते. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)