विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: May 13, 2014 00:02 IST2014-05-13T00:02:56+5:302014-05-13T00:02:56+5:30
येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळ असलेल्या विहिरीत पुलगाव येथील एका युवकाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ माजली.

विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला
पुलगाव : येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळ असलेल्या विहिरीत पुलगाव येथील एका युवकाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ माजली. मृतकाचे नाव मंगेश सुरेश हनुमंते (३८) रा. श्रीनगर कॉलनी असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघड झाली. पुलगाव-विरूळ मार्गावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या दरोड्याशी त्याचा संबध असल्याची चर्चा परिसरात असली तरी पोलिसांनी ही चर्चा खोटी असल्याचे सांगितले आहे. पुलगाव शहरातील मंगेश हनुमंते हा फोटोग्राफीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवित होता. शहरातील महाविर चौकात त्याचे मंगेश फोटो स्टुडीओ नामक दुकान आहे. त्याच्या याच व्यवसायातून त्याने अयोध्यानगर येथील प्रकाश राऊत यांच्या मुलाच्या लग्नाच्या चित्रीकरणाचे काम घेतले होते. या कामाकरिता रविवारी गेला तो रात्री परत आला नाही. दुसर्या दिवशी त्याचा शोध घेतला असता सोमवारी सकाळी ९ वाजता नाचणगाव-पुलगाव मार्गावरील जुन्या तहसील कार्यालयाजवळील विहिरीत त्याचे प्रेत असल्याची माहिती त्याच्या घरच्यांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहजवळ त्याचा कॅमेरा व विहिरीजवळ त्याची दुचाकी उभी होती. या व्यतिरिक्त घटनास्थळी दुसरी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मंगेश याला सिगारेट ओढण्याची सवय असल्याने तो तिथे गेला असावा व त्याचा तोल गेल्याने विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगेशचा घात की अपघात याचा तपास ठाणेदार राजेंद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)