विहिरीत आढळला तरूणाचा मृतदेह
By Admin | Updated: October 13, 2016 01:17 IST2016-10-13T01:17:36+5:302016-10-13T01:17:36+5:30
हिंंगणी-नानबर्डी मार्गावरील नितीन निघडे यांच्या शेतातील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आला.

विहिरीत आढळला तरूणाचा मृतदेह
घातपाताची शक्यता : नानबर्डी शिवारातील घटना
बोरधरण : हिंंगणी-नानबर्डी मार्गावरील नितीन निघडे यांच्या शेतातील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. प्रशांत किशोर गोडबोले (२०) रा. रेहकी, असे मृतकाचे नाव आहे.
मोलमजुरीचे काम करणारा प्रशांत शनिवारी घरातून बाहेर पडला. कामावर जातो म्हणून जेवणाचा डबा व कामावर घालण्यासाठी कपडे सोबत होते; पण तो त्या दिवसापासून घरी परतलाच नाही. मंगळवारी त्याचा निघडे यांच्या शेतातील विहीरीत सकाळी फिरण्यास गेलेल्या दीपक शंभरकर यांना मृतदेहच आढळला. त्यांनी याबाबत पोलीस पाटील मारोती चचाने यांना माहिती दिली. पोलीस पाटलांनी सेलू पोलिसांना सूचना दिली. निघडे यांनी पोलिसात लेखी तक्रार नोंदविली. सेलू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. त्याच्या फुलपँटच्या खिशात उंदीर मारण्याच्या औषधाची पुडी आढळली. चप्पला विहिरीत होत्या. सदर तरुणाची आत्महत्या की घातपात, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. पूढील तपास ठाणेदार विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलीस करीत आहे.(वार्ताहर)
वर्धेच्या तरूणाचा बोरधरणात बुडून मृत्यू
मित्रासोबत वर्धा येथून बोरधरणला आलेल्या तरुणाला पोहण्याचा मोह आवरला नाही. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजता घडली. नितीन रमेश निकोडे (३४) रा. साईनगर वर्धा असे मृतकाचे नाव आहे. तो पाच मित्रांसह बोरधरण येथे आला. सर्व मित्र धरण पाहत असताना नितीन पोहण्यासाठी पाण्यात उतरला. त्याला पोहता येत नसताना मित्रांनी अडविले नाही. पाचही मित्रांच्या डोळ्यासमोर नितीनचा बुडून मृत्यू झाला. मित्रांनी याबाबत सेलू पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत.