मंडळ अधिकाऱ्याला अटक
By Admin | Updated: February 14, 2016 01:55 IST2016-02-14T01:55:13+5:302016-02-14T01:55:13+5:30
नोकरीचे आमिष देऊन आठ ते दहा जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाल गजानन मडावी याला सावंगी पोलिसांनी अटक केली होती.

मंडळ अधिकाऱ्याला अटक
नोकरीचे आमिष प्रकरण : आरोपींची संख्या दोन
वर्धा : नोकरीचे आमिष देऊन आठ ते दहा जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाल गजानन मडावी याला सावंगी पोलिसांनी अटक केली होती. त्याला पोलीस कोठडी ठोवण्यात आली असता त्याने दिलेल्या कबुलीत मंडळ अधिकारी योगेश निकम याचे नाव सांगितले. यावरून सावंगी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री निकम याला अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाल गजानन मडावी रा. सालोड हिरापूर हा जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी काम करायचा. त्याने नोकरीचे आमिष देऊन सालोड (हिरापूर) येथील आॅटोचालक विजय राऊत याच्यासह सात ते आठ जणांना नोकरीचे आमिष देत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. या प्रकरणी विजय राऊत याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंगी (मेघे) पोलिसांनी मडावी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून तपास सुरू आहे. यात त्याला पोलिसांना अधिक विचारणा केली असमा त्याने या कामात त्याला मंडळ अधिकारी योगेश निकम याचे सहकार्य असल्याचे कबुल केले. त्याच्या कबुलीवरून पोलिसांनी मंडळ अधिकारी योगेश निकम याला रात्री १२.१० वाजता अटक केली.
तत्पूर्वी पोलीस कोठडीत असलेल्या गजानन मडावी याच्याकडून पोलिसांनी सेवा पुस्तिका उपविभागीय अधिकाऱ्याचा रबर स्टॅम्प आदी साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सावंगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या प्रत्यक्ष हजेरीत कर्मचारी प्रदीप राऊत, ओमप्रकाश नागापुरे, दिलीप गेडे, विकास अवचट, नवनाथ मुंडे आदींनी केली.(प्रतिनिधी)
कोतवालाचे मंडळ अधिकाऱ्याकडे बोट
नोकरी देण्याच्या या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेला कोतवाल गजानन मडावी याने या कामात त्याला मंडळ अधिकारी योगेश निकम याने याचे सहकार्य असल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीवरून सावंगी पोलिसांनी निकम याला मध्यरात्री अटक केली. या प्रकरणात योगेश निकम हा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
कोतवालापासून सुरू झालेल्या या प्रकरणात मंडळ अधिकारी आरोपी झाला. यामुळे वर्धेत नोकरी लावून देण्याकरिता मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे नाकारता येत नाही. या प्रकरणात आणखी कोणाचे नाव येते याकडे साऱ्यांचे लक्ष आाहे.