जिल्ह्यात प्रथमच आढळला निळ्या शेपटीचा पाणपोपट
By Admin | Updated: October 12, 2015 02:15 IST2015-10-12T02:15:47+5:302015-10-12T02:15:47+5:30
वन्यजीव सप्ताह जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला जात आहे. या सप्ताहादरम्यान निळ्या शेपटीचा पाणपोपट ज्याला इंग्रजीत ‘ब्ल्यू टेल्ड बी इटर’ असेही म्हणतात,...

जिल्ह्यात प्रथमच आढळला निळ्या शेपटीचा पाणपोपट
पक्षी अभ्यासकांनी केली नोंद : बहार नेचर फाऊंडेशन करणार सूची जाहीर
वर्धा : वन्यजीव सप्ताह जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला जात आहे. या सप्ताहादरम्यान निळ्या शेपटीचा पाणपोपट ज्याला इंग्रजीत ‘ब्ल्यू टेल्ड बी इटर’ असेही म्हणतात, हा पक्षी जिल्ह्यात प्रथमच आढळला. पक्षी अभ्यासक व बहारचे सचिव दिलीप वीरखडे यांनी ही नोंद नुकतीच केलेली आहे.
या पक्ष्याला निळ्या शेपटीचा राघू असेही नाव आहे. आपल्याकडे नियमित दिसणाऱ्या राघू पेक्षा हा पक्षी आकाराने मोठा असून डोळ्यालगत काळी पट्टी, गळ्यावरील भाग पिवळा, गळा व छातीवर तांबूस पट्टा असून पार्श्वभाग आणि शेपटी निळी असते. नर-मादी दिसायला सारखेच असतात. देशाच्या उत्तर व उत्तर पूर्वेकडील भागात याची वीण होत असून दक्षिणेकडे आंध्र कर्नाटकापासून श्रीलंका या भागात हे पक्षी हिवाळी पाहुणे असतात. या पूर्वी विदर्भात अगदीच तुरळक ठिकाणी या पक्ष्यांची नोंद घेण्यात आलेली आहे. साधारणत: पाणस्थळ जागा या पक्ष्यांची आवडती असून वर्धा शहरानजीक असलेल्या एका तलाव परिसराजवळ हे छायाचित्र घेऊन नोंद करण्यात आली.
बहार नेचर फाऊंडेशनतर्फे वर्धा जिल्ह्यातील पक्षीसूची तयार करण्याचे काम सुरू असून ही सूची १२ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केली जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
या पक्ष्यांचा अधिक अभ्यास व सर्वेक्षण करण्याची गरज फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर वानखडे, रमेश बाकडे, रवींद्र पाटील, संजय इंगळे तिगावकर, पराग दांडगे, राहुल तेलरांधे, पक्षीमित्र व अभ्यासक वैभव देशमुख, दीपक गुढेकर, डॉ. बाबाजी घेवडे, डॉ. जयंत वाघ, जयंत सबाने यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)