घटनास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर रक्ताचे डाग ?
By Admin | Updated: November 10, 2014 22:47 IST2014-11-10T22:47:09+5:302014-11-10T22:47:09+5:30
घरून बेपत्ता असलेल्या नऊ वर्षीय रूपेश मुडे या बालकाचा मृतदेह गांधीनगर परिसरात असलेल्या विकास विद्यालयाच्या मागच्या बाजूस आढळला. घटनास्थळी जाणाऱ्या मार्गावर सलग काही

घटनास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर रक्ताचे डाग ?
रूपेश मृत्यू प्रकरण : रक्ताच्या डागांचे घेतले नमुने
वर्धा : घरून बेपत्ता असलेल्या नऊ वर्षीय रूपेश मुडे या बालकाचा मृतदेह गांधीनगर परिसरात असलेल्या विकास विद्यालयाच्या मागच्या बाजूस आढळला. घटनास्थळी जाणाऱ्या मार्गावर सलग काही अंतरापर्यंत लाल रंगाचे डाग आढळले. ते रूपेशच्या रक्ताचे असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्या डागाचे नमुने पोलिसांनी घेतले असून ते तपासणीकरिता न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठविले आहे.
आर्वी नाका परिसरातील झोपडपट्टी येथील रूपेश हिरामण मुडे हा शनिवारी सायंकाळपासून अचानक बेपत्ता झाला. याची तक्रार त्याची आई रेणुका मुडे यांनी शहर पोलिसात दाखल केली होती. या घटनेकडे पोलिसांनी गांभिर्याने लक्ष दिले नाही. अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेहच आढळला. मृतदेह विच्छिन्न अवस्थेत तर होताच शिवाय मृतदेहाचे काही अवयव बेपत्ता असल्याने नररबळीचा प्रकार असावा, संशय व्यक्त करण्यात आला होता. याची सर्वत्र चर्चा सुरू असताना शहर पोलीस रूपेशचा मृत्यू कुत्रे वा कोल्ह्याच्या हल्ल्यात झाल्याचा तर्क लावण्यात व्यस्त झाले.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास या मार्गावर एका रांगेत रक्ताचे डाग असल्याची माहिती रूपेशच्या नातलगांनी पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच शहर ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर बुराडे यांनी चमूसह घटनास्थळ गाठले. त्यांनी रस्त्यावर पडून असलेल्या रक्ताच्या डागांचे निरीक्षण केले. निदर्शनास येत असलेले लाल डाग रक्ताचे वा आणखी कशाचे, याबाबत पोलिसात एकमत नाही. यात घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांनी रस्त्यावर पडलेल्या या डागाची सुरुवात नेमकी कुठून झाली, याचा शोध घेतला असता ते केसरीमल कन्या शाळेकडून गांधीनगर परिसरापर्यंत दिसून आले.
रस्त्यावरील त्या डागाचे नमुने पोलिसांनी घेतले. ते नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे. रक्ताच्या नमुन्याचा तपासणी अहवाल आल्यानंतर हे नमुने मृतकाच्या रक्ताशी जुळवून पाहण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे.
सध्या या प्रकरणात पोलिसांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नसून रूपेश या ठिकाणी पोहोचला वा त्याला मारून आणून टाकण्यात आले या दिशेने पोलिसांचा तपास सुरू असल्याचे ठाणेदार बुराडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रूपेशचा मृतदेह ज्या स्थितीत आढळला त्यामुळे नरबळीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे सदर प्रकरणाची चौकशी अंनिसकडून करण्यात येत आहे. शिवाय अशा प्रकराची चौकशी करण्याकरिता शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा प्रचार, प्रसार अंमलबजावणी समिती जिल्ह्यात कार्यरत आहे. या समितीचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी तर सचिव म्हणून सहआयुक्त समाजकल्याण विभाग आहेत. या समितीच्यावतीने या प्रकरणाचा अभ्यास करून चौकशी करण्यात येणार आहे. मृतकाच्या आई वडिलांसह परिसरातील नागरिकांशी भेटून परिस्थिती जाणून घेण्यात येणार आहे. यात काही माहिती पोलिसांकडे असून त्यांच्याकडूनही माहिती घेण्यात येणार आहे. यातून अभ्यास करून प्रकरणाचा छडा लावण्याकरिता अंनिसच्यावतीने पोलिसांना सहकार्य करण्यात येणार असल्याचे समितीचे समन्वयक पंकज वंजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.