नाल्याला मानवी कचऱ्याचा विळखा
By Admin | Updated: July 13, 2016 02:54 IST2016-07-13T02:54:10+5:302016-07-13T02:54:10+5:30
मानवी कचऱ्यापासून कुठलाही नैसर्गिक घटक वाचू शकलेला नाही. खाली भूखंडांप्रमाणे आता मोठमोठे नालेही या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे.

नाल्याला मानवी कचऱ्याचा विळखा
प्रवाह अवरुद्ध : कठडे नसल्याने नाला ठरतोय धोक्याचा
वर्धा : मानवी कचऱ्यापासून कुठलाही नैसर्गिक घटक वाचू शकलेला नाही. खाली भूखंडांप्रमाणे आता मोठमोठे नालेही या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे कधीकाळी प्रवाही असलेले मोठमोठे नालेही आज आपले अस्तित्व हरवून बसले आहे. शहरानजीक नालवाडीजवळ असलेल्या एका नाल्यावर वाढत चाललेला मानवी कचरा त्याचा नैसर्गिक प्रवाह अवरुद्ध करीत आहे.
पवनार मार्गावर नालवाडी परिसरात वाहणारा नाला हा बारमाही वाहता असतो. या नाल्यावर नालवाडी भागात पूलही बांधण्यात आला आहे. या पुलाला कठडे नसल्याने हा भाग आधीच धोक्याचा ठरत आहे. पण या काही वर्षांत आसपासच्या परिसरातील मानवी कचरा या नाल्यात वरून फेकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे नाल्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे.
हा नाला पुढे वरूड शेतशिवारांमधून वाहतो. यामुळे वरूड भागातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास यामुळे मदतही होते. या नाल्यावर मासेमारीही केली जाते. पण शहराचा विस्तार नाल्यापर्यंत येऊन टेकल्याने कधी काळी रानवाटांमधून वाहणारा हा नाला आज शहरी वस्तीत आला आहे.
परिसरातील मानवी कचरा या नाल्यात फेकला जात आहे. यात प्लास्टिकचाच भरणा जास्त असल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अवरुद्ध होत आहे. नाल्यावर सर्वत्र प्लास्टिक कचरा पसरला आहे. यामुळे पाणी पुढे वाहून जाण्यास अवरोध होतो. सबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत नाल्याचा नैसर्गिक प्रवाह विस्तारित करण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)