गारपिटीचा तडाखा
By Admin | Updated: March 16, 2015 01:37 IST2015-03-16T01:37:45+5:302015-03-16T01:37:45+5:30
अवकाळी पाऊस व गारपीट यंदा शेतकऱ्याची पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. गत दोन महिन्यापासून जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे.

गारपिटीचा तडाखा
वर्धा : अवकाळी पाऊस व गारपीट यंदा शेतकऱ्याची पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. गत दोन महिन्यापासून जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले आहे. जुन्या आठवणी शेतकरी विसरत नाही तोच रविवारी पुन्हा गारपिटीचा तडाखा बसला. दुपारी ३ वाजतापासून सुरू झालेला हा पाऊस रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होता. यावेळी जिल्ह्यातील विविध भागात बोराच्या आकाराच्या गारी पडल्या. या गारपिटीमुळे शेतात उभ्या असलेल्या गव्हासह चणा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात वर्धा, सेलू, देवळी, कारंजा (घाडगे) व आर्वी या भागाला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.
वर्धेत सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आलेल्या पावसात गारपीट झाली. यावेळी असलेल्या वाऱ्यामुळे शहरातील वंजारी चौक व आर्वी नाका परिसरात विद्यूत तारा तुटल्याले काही काळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. वर्धेतील रस्त्याच्या कडेला गारांचा खच साचला होता. तर सालोड (हिरापूर) येथे पावसात सापडलेले दोघे जखमी झाले.
कारंजा तालुक्यातील धर्ती, भालु, बोरी, सोनेगांव या गावांना गारपिटीचा फटका बसला होता. तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मेटहिरजी या गावाला १ तास गारपिटीने झोडपले. येथील हजारावर हेक्टर शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. सुमारे एक तास वादळी वारा व पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. गारपीटीने शंभरच्यावर घरांचे कवेलू फुटल्याचे येथील विनोद सिरसाम यांनी सांगितले. येथीलच जगदीश डोये यांच्या शेतातील ३ एकर गहु व चना भूईसपाट झाला. येथील जमीन शंभर टक्के ओलिताची असल्याने संत्रा, गहु, चणा पीक घेतात. ऐन कापणीच्या वेळी बसलेल्या गारपिटीच्या तडाख्यामुळे त्यांना चांगलाच फटका बसला. गावातील अनेक घरावरील कवेलु फुटुन पाणी घरात शिरल्याने घरातील साहित्याची नासधुस झाली.
देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी), चिकणी, जामणी, नागझरी, इंझाळा आदी गावात १५ ते २० मिनीटपर्यंत बोर व आवळ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. सोनेगाव आबाजी येथील उदय काशीकर यांचा दोन एकरातील कांदा जमीनदोस्त होऊन त्यांचे दोन लाखाचे नुकसान झाले. तसेच चिकणी व जामणी येथे सुद्धा १५ ते २० मिनीटपर्यंत गारा होऊन पिकांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे नागझरी व इंझाळा येथे तुरीचे आकाराच्या गारा व वादळी पाऊस झाला.
सेलू तालुक्यातील रेहकी, सुरगाव या भागात सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यावेळी गारपीट झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले. शिवाय बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात सवंगनी करून ठेवलेला गहू ओला झाल्याने नुकसान सोसावे लागले.
आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा, तरोडा, बोथली या तीन गावांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा चांगलात तडाखा बसला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. गावात सुमारे २० मिनीट गारपीट झाल्याने झाडावरील पाने गळाली तर घरांवरील कवेलूचे नुकसान झाले. सुदैवाने यात प्राणहानी झाल्याची माहिती नाही. मात्र चरायला गेलेले जनावर अडकून पडल्याने शेतकऱ्यांची ताराबंळ उडाली. झालेल्या नुकसानाची पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
सालोड येथे दोघे जखमी; मेटहिरजी येथे तासभर गारपीट
शेतात काम करीत असताना वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसात असलेल्या बैलांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पावसासोबत असलेल्या गारपिटीचा फटका बसला. गारपिटीतून बचावाच्या प्रयत्नात असलेल्या शंकर कोडापे व कैलास सोनटक्के या दोघांना गारांचा मार बसल्याने दोघेही जखमी झाले.
कारंजा तालुक्यातील मेटहिरजी या गावात सुमारे एक तास पावसाने थैमान घातले. तासभरात झालेल्या या गारपिटीमुळे फावड्याने गारा गोळा करण्यागत खच पडला होता.
देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी), चिकणी, नागझरी, इंझाळा या गावातील गहू, चणा व कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाले. येथे बोराच्या आकाराच्या गारा पडल्या.
सेलू तालुक्यात शेतात सवंगणी करून ठेवलेला गहू व इतर पिके ओली झालीत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.
आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा, तरोडा, बोथली या तीन गावांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा चांगलाच तडाखा बसला. दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली तर २० मिनीटे गारपीट झाल्याने झाडावरील पाने गळाली व घरांवरील कवेलूंचे नुकसान झाले.