काळ्या फीत लावून निषेध
By Admin | Updated: August 26, 2016 02:08 IST2016-08-26T02:08:56+5:302016-08-26T02:08:56+5:30
आयटकप्रणित अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या देशव्यापी जेलभरोनंतर केंद्र शासनाने अंगणवाडी,

काळ्या फीत लावून निषेध
आयटकचे आंदोलन : अंगणवाडी, गटप्रवर्तकांचा सहभाग
वर्धा : आयटकप्रणित अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या देशव्यापी जेलभरोनंतर केंद्र शासनाने अंगणवाडी, आशा व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीद्वारे प्राँव्हिडंड फंड (ईपीएफ) व एम्प्लाँईज स्टेट इशुरन्स (ईएसआयसी) मार्फत आरोग्य सेवेचा लाभ देण्याची ग्वाही केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी दिली. याबाबत २२ आॅगस्ट रोजी आदेश काढण्याचे सांगितले; पण अद्याप आदेश काढले नाही. यामुळे देवळी तालुक्यातील अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक यांनी काळी फीत लावून शासनाचा निषेध नोंदविला.
जिल्ह्यात गुरूवारी अंगणवाडी सेविका, आशा व आरोग्य सेविका यांची प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सभा घेतली जाते. त्या सभेत महिला कर्मचारी, अंगणवाडी, आशा, गट प्रवर्तक यांनी काळी फीत लावून सभेत सहभाग घेत निषेध नोंदविला.
शासनाविरूद्ध २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अंगणवाडी युनियनच्या तालुका सचिव रंजना तांबेकर, जिल्हाध्यक्ष संध्या म्हैसकर, देवळी तालुका अध्यक्ष योगीता डाहाके यांनी केले. आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, प्रमोद धुळे, चंद्रकांत वाघुले, प्रमोद लकडे, प्रशांत आदमने, सुधा रामटेके यांनी पाठींबा दिला. आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी रविवारी आयटक कार्यालय बोरगांव येथे ११ वाजता बैठक असल्याचेही कळविण्यात आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)