जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा
By Admin | Updated: September 21, 2014 23:54 IST2014-09-21T23:54:47+5:302014-09-21T23:54:47+5:30
आघाडीचे सहा सदस्य गैरहजर असल्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताचा २६ हा आकडा नसतानाही भाजपाने जिल्हा परिषदेवर

जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा
वर्धा : आघाडीचे सहा सदस्य गैरहजर असल्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताचा २६ हा आकडा नसतानाही भाजपाने जिल्हा परिषदेवर झेंडा फडकाविला. हिंगणी गटाच्या सदस्य चित्रा रणनवरे अध्यक्ष तर सावंगी (मेघे) गटाचे सदस्य विलास कांबळे हे नवे उपाध्यक्ष म्हणून विजयी झाले. गैर काँग्रेसी पक्षाने जिल्हा परिषदेवर सत्ता हस्तगत केल्याची ही वर्धा जिल्ह्यातील तिसरी वेळ होय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक झाल्याने पुढे काय चित्र राहील, याकडे लक्ष लागले आहे.
आघाडीकडून अध्यक्षपदासाठी उषाकिरण थुटे, निर्मला दंडारे तर उपाध्यक्षपदाकरिता संजय कामनापुरे यांनी नामांकन दाखल केले होते. भाजपाकडून अध्यक्षपदाकरिता चित्रा रणनवरे, चेतना मानमोडे यांनी तर उपाध्यक्षाकरिता विलास कांबळे यांचे नामांकन होते. जि.प. सभागृहात सुरू असलेल्या गदारोळात कोण विजयी होणार, अशी उत्सुकता मतमोजणीपर्यंत कायम होती. अशात दंडारे व मानमोडे यांनी नामांकन परत घेतल्याने सरळ लढत झाली. हात उंचावून झालेल्या मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय भागवत यांनी २५ विरूद्ध १९ अशा फरकाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चित्रा रणनवरे आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विलास कांबळे यांनी विजय संपादन केल्याची घोषणा करताच भाजप नेत्यांचे चेहरे फुलले. जिल्हा परिषद निवडणुकीची चाहुल लागताच भाजपात नव्याने दाखल झालेले माजी खासदार दत्ता मेघे सक्रीय झाले. त्यांनीच पडद्यामागून या निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सूत्रे हलविली. कोणत्याही परिस्थितीत सत्ता हस्तगत करायचीच असा निर्धारच त्यांनी केला होता, असे आता बोलले जात आहे. मागील १५ दिवसांपासून या दिशेने हालचालींना वेग आला होता. आघाडीतील काही सदस्य संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याचे लक्षात येताच आघाडीचे नेते ना. रणजित कांबळे, आ. सुरेश देशमुख यांनीही हालचाली सुरू केल्या. अखेरच्या क्षणापर्यंत आपली राजकीय शक्ती पणाला लावून या दोन्ही नेत्यांनी खिंड लढविली. मात्र त्यांना गैरहजर राहिलेल्या सदस्यांमुळे सत्ता राखता आली नाही. लोकसभा निवडणूक भाजपाने जिंकली. त्यानंतर आता जिल्हा परिषदेवरही झेंडा फडकावू, अशा विचाराने भाजपचे नेतेमंडळी कामाला लागले होते. त्यानुसार पळवापळवीही झाली. अखेर या राजकीय घडोमोडीनंतर भाजपाने सत्ता हस्तगत करण्यात यश मिळविले. जिल्हा परिषद काँग्रेसकडून भाजपाने हिसकावली. या निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर किती प्रभाव पडतो, याकडे लक्ष लागले आहे.(लोकमत चमू)