तालुक्यावर भाजपाचे वर्चस्व, काँगे्रसला दोन जागा

By Admin | Updated: February 24, 2017 02:13 IST2017-02-24T02:13:11+5:302017-02-24T02:13:11+5:30

तालुक्यातील जि.प. च्या ७ गटासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी ४ जागांवर तर पंचायत

BJP dominates taluka, Congress has two seats | तालुक्यावर भाजपाचे वर्चस्व, काँगे्रसला दोन जागा

तालुक्यावर भाजपाचे वर्चस्व, काँगे्रसला दोन जागा

हिंगणघाट : तालुक्यातील जि.प. च्या ७ गटासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी ४ जागांवर तर पंचायत समितीच्या १४ गणांपैकी ७ जागांवर विजय मिळवीत वर्चस्व सिद्ध केले. जि.प. च्या दोन जागा काँगे्रसने तर एक जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने मिळविली. पं.स. मध्ये काँगे्रसने तीन, राष्ट्रवादीने दोन, शिवसेना आणि स्वभापने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला. यापूर्वी पं.स.वर राष्ट्रवादीची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपने आ. समीर कुणावार यांच्या नेतृत्वात लक्षणीय कामगिरी केली.
विद्यमान पं.स. सभापती तसेच राष्ट्रवादीचे वाघोली गटाचे उमेदवार संजय तपासे यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे शरद शहारे यांनी ३६४ मतांनी विजय मिळवीत त्यांच्या गडाला सुरूंग लावला. सावली गटात भाजपचे नितीन मडावी यांनी स्वभापचे मागील १५ वर्षांच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला. अल्लीपूर गटात कॉंग्रेसचे माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांच्या पत्नी विभा ढगे यांनी ६३२ मतांनी विजय मिळवीत आपली जागा कायम राखली. राष्ट्रवादीच्या पुष्पा सातोकर यांनी २८१६ मते घेतली. जिल्हा परिषदेचा कानगाव मतदार संघ राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. या गटातून राष्ट्रवादीचे धनराज तेलंग यांना ९० मतांनी निसटता विजय मिळविता आला. गटात अत्यंत चुरशीची लढत झाली. काँगे्रसचे प्रकाश वाघमारे २१४२ मते, भाजपचे श्याम शंभरकर २००५ व शिवसेनेचे राजू नांदरे १९९७ मते घेत त्यांना तुल्यबळ लढत दिली. वडनेर गट राखण्यात भाजपला यश आले. भाजपच्या ज्योत्स्ना सरोदे यांनी १७२५ या मोठ्या फरकाने विजय मिळविला. राष्ट्रवादीच्या विशाखा या २४३४ मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिल्या. शेकापूर (बाई ) गटात भाजपचे ज्येष्ठ उमेदवार व जि.प. शिक्षण सभापती वसंत आंबटकर यांना मोठा हादरा बसला. ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. या गटात काँगे्रसचे उमेदवार व पं.स. उपसभापती मिलिंद कोपुलवार यांनी २७२७ मते घेत ६९३ मतांनी विजय मिळविला. आंबटकर यांना २०३४ मते मिळाली. पोहणा गटात भाजपचे माधव चंदनखेडे यांनी निवडणूक कौशल्याची चुनूक पुन्हा दाखविली. पती-पत्नी मिळून त्यांचा हा चवथा विजय ठरला. या गटात त्यांना ३८३३ मते मिळाली. त्यांची लढत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्याशी असल्याने या गटाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सुनील राऊत यांना २९४२ मते मिळाली. पं.स. निवडणुकीत कुटकी गणात भाजपचे संभाव्य सभापती पदाचे उमेदवार प्रफुल्ल बाडे केवळ एका मताने पराभूत झाले. या गणात काँगे्रसचे आशिष पोटरकर यांनी ९९९ मते घेत विजय मिळविला. पं.स. मध्ये भाजपला ७, काँगे्रस ३, राष्ट्रवादी २, शिवसेना व स्वभाप प्रत्येकी एक असे संख्याबळ मिळविता आले. पं.स.मध्ये भाजप प्रथमच मोठा पक्ष म्हणून उदयास आला; पण बहुमतासाठी त्यांना दुसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: BJP dominates taluka, Congress has two seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.