भाजप मोठा पक्ष, संकेत मात्र त्रिशंकूचे

By Admin | Updated: February 23, 2017 00:45 IST2017-02-23T00:45:22+5:302017-02-23T00:45:22+5:30

तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील सहाही नगर पालिकांवर भाजपाची एकहाती सत्ता आली;

The BJP is a big party, the signal hungs only | भाजप मोठा पक्ष, संकेत मात्र त्रिशंकूचे

भाजप मोठा पक्ष, संकेत मात्र त्रिशंकूचे

मिनी मंत्रालयाचा महासंग्राम : राजकीय पक्षांकडून गोळाबेरीज
राजेश भोजेकर   वर्धा
तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील सहाही नगर पालिकांवर भाजपाची एकहाती सत्ता आली; पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ही स्थिती कायम ठेवण्यात अपयश आल्याने मिनी मंत्रालयावर एकहाती झेंडा फडकाविण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होईल, याबाबत साशंकतेचे वातावरण आहे. याहीवेळी त्रिशंकूची स्थिती कायम राहील. भाजप मोठा पक्ष असेल; पण बहुमतासाठी जुळवाजुळव करावी लागेल, असे भाकित वर्तविले जात आहे. याचा फैसला गुरुवारी होणार आहे.
मतदान झाल्यापासून काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण बघायला मिळते. २०१२ च्या निवडणुकीपेक्षा काँग्रेसच्या अधिक जागा निवडून येतील, असाही अंदाज वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक काँगे्रस आणि राष्ट्रवादीने अतिशय गांभिर्याने घेतली होती. याचाच परिपाक सकारात्मक वातावरण निर्मितीत झाला. काँगे्रसने उमेदवारी वाटपातही बारीक-सारीक बाबींचा विचार केला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही जागांवर दमदार उमेदवार दिल्याने भाजपची चांगलीच अडचण होत असल्याचे जाणवत होते.
भाजपात या उलट परिस्थिती बघायला मिळाली. उमेदवारी देतानाही कोणतेही निकष पाळले गेले नाही. त्यातही अंतर्गत कलहाचे वातावरण बघायला मिळाले. पक्षात नेतृत्वाचा अभाव प्रकर्षाने जाणवला. प्रत्येक नेते विशिष्ट व्यक्तीसाठी भांडताना दिसले. पक्षहित कुठेही दिसत नव्हते. गंभीर बाब म्हणजे, काही जागांवर भाजपच्या उमेदवारांना डावलू न शकल्याने त्यांना तिकीट मिळाल्यानंतर पाडण्याचा कटही भाजपात मोठ्या प्रमाणावर शिजला. उमेदवारी देताना व्यक्तीला महत्त्व देण्यात आले. कुणाला उमेदवारी दिली तर विजय पक्षाचा होईल, या विचाराचाही अभाव जाणवला. मोदी लाटेचाच आधार भाजपला होता, असे एकंदर चित्र बघायला मिळाले.
नगर पालिका निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावावर पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्या. हा मुद्दा ज्वलंत होता. त्यामुळे सामान्यांना त्यावेळी हा मुद्दा पटला होता. याचाच फायदा नगर पालिका निवडणुकीत भाजपला मिळाला. या निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी गुरुवारी आहे. या काळापर्यंत नोटाबंदीचे चांगले-वाईट परिणाम लोकांना प्रत्यक्ष अनुभवाला आले. जिल्हा परिषदेसाठी ग्रामीण मतदार मतदान करतो. यामध्ये शेतकरी वर्गाचा सर्वाधिक समावेश आहे. नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांसह शेतमजुरांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. शेतमालाचे भाव गडगडले. ग्रामीण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडली होती. दोन हजाराची नोट मिळाली, तर ती सुटे करण्यासाठी कसरत करावी लागत होती. व्यापारी वर्गांकडून शेतमाल खरेदीतही शेतकऱ्यांची चांगलीच लूट झाली. यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने या निवडणुकीत भाजपला मतदान केले असेल, याबाबत साशंकताच आहे.
भाजपची मंडळी पक्षाने केलेल्या चार सर्व्हेत भाजपला वर्धा जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळेल, असे सांगत आहे; पण त्यांच्या शब्दात नगर पालिका निवडणुकीत होते तसे वजन वाटत नव्हते. या उलट काँग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे भाव दिसत आहेत.
एकंदर राजकीय पक्षाच्या गोटातील वातावरण कसेही असले तरी सर्व स्तरावर सत्ता असल्याने भाजप मोठा पक्ष राहील. आता काही तासांनी निवडणुकीचे निकाल येणार आहेत. यामध्ये काँग्रेसच्या जागा वाढतील वा भाजप बहुमताकडे आगेकूच करते, हे कळेलच!

 

Web Title: The BJP is a big party, the signal hungs only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.