महिलेची घरीच प्रसूती
By Admin | Updated: May 22, 2015 02:21 IST2015-05-22T02:21:09+5:302015-05-22T02:21:09+5:30
गभर्वती महिलांकरिता शासनाच्यावतीने विविध योजना अस्तित्त्वात आणल्या आहेत.

महिलेची घरीच प्रसूती
आरोग्य सेवा कुचकामी : शासकीय योजना कागदावरच
शालिक सावसाकडे कोरा
गभर्वती महिलांकरिता शासनाच्यावतीने विविध योजना अस्तित्त्वात आणल्या आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना जिल्ह्यातील दुर्गम भागातील महिलांना मात्र याचा लाभ होत नसल्याचे दिसून आले आहे. समुद्रपूर तालुक्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या कोरा या गावात रुग्णालयाची सुविधा असताना घरीच प्रसूती करण्याची वेळ महिलेवर आल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवा कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरा येथील गर्भवती महिला अर्चना मारबते ही गावातील आरोग्य केंद्रात उपचार घेत होती. मंगळवारी रात्री अनाचक तिला प्रसवकळा आल्याने तिच्या कुटुंबीयांनी आरोग्य केंद्रात नेले; मात्र गावातील दोनही आरोग्य केंद्र कुलूपबंद होते. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी इतरत्र धावपळ केली असता त्यांना आरोग्य सेवेत असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याची मदत मिळाली नाही. यामुळे त्यांनी तिला नाईलाजास्तव घरी परत आणले. तिच्या प्रसवकळा वाढतच होत्या. त्या असह्य होत असल्याने कुटुंबीयांनी अखेर गावातील ‘सूईन’ला बोलावून आणले. गावातील या अप्रशिक्षित महिलेकडून अर्चनाची प्रसूती करण्यात आली. या प्रकारात आई व बाळाची प्रकृती ठिक असल्याने यात कुठलाही धोका झाला नाही. जर यात बाळाला व त्याच्या आईला काही धोका उद्भवला असता तर त्याची जबादारी कुणाची, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
कोरा येथे एक नाही तर शासनाची दोन आरोग्य केंद्रे आहेत. यातील एक आयुर्वेदिक व दुसरे अॅलोपॅथिक सेवा देणारे आहे. अर्चनाच्या प्रसवकळा वाढत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला या दोनही आरोग्य केंद्रात नेले; मात्र दोनही ठिकाणी कुलूप होते. आरोग्य सेवा पुरविण्याकरिता लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही सुविधा जर वेळीच उपयोगी ठरत नसेल तर त्याचा उपयोग काय असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा शासनाचा दंडक आहे. असे असताना येथे मात्र या नियमांना तिलांजली दिल्याचे समोर आले आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कोरा येथील नागरिक करीत आहेत.