जन्मदिनच ठरला त्याचा ‘मृत्युदिन’
By Admin | Updated: October 13, 2014 23:24 IST2014-10-13T23:24:41+5:302014-10-13T23:24:41+5:30
जन्मदिवसाचे औचित्य साधून त्याच दिवशी साक्षगंध करण्याचे ठरविले. पण साक्षगंध होण्यापूर्वीच तरुणाने जगाचा निरोप घेतल्याची घटना आर्वी येथे घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जन्मदिनच ठरला त्याचा ‘मृत्युदिन’
आर्वी : जन्मदिवसाचे औचित्य साधून त्याच दिवशी साक्षगंध करण्याचे ठरविले. पण साक्षगंध होण्यापूर्वीच तरुणाने जगाचा निरोप घेतल्याची घटना आर्वी येथे घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या युवकाचे नाव महोम्मद तनवीर मोहम्मद जाबीर असे आहे.
मोहम्मद तनवीर मोहम्मद जाबीर (२७) हा मूळचा आर्वी शहरातील रहिवासी असून गत दीड वर्षांपासून पुलगाव येथे वास्तव्यास आहे. नागपूर येथील एका शिकवणी वर्गात कार्यरत असलेल्या तनवीरचा विवाह आर्वीतीलच त्याच्या नात्यात असलेल्या शब्बीर पटेल भुरू पटेल यांच्या मुलीसोबत निश्चित झाला होता. त्या निमित्ताने १२ आॅक्टोबर रोजी साक्षगंधाचा कार्यक्रम येथील एका मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता.
याच दिवशी मोहम्मद तनवीर याचा जन्मदिवस असल्याचे ओचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व नातलग मंडळी कार्यक्रमानिमित्त येथे उपस्थित झाली होती. सकाळी अचानक तनवीरला ताप आला. प्रकृती गंभीर झाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला सावंगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. सावंगीचा प्रवास सुरू असताना वाटेतच तनवीरचा मृत्यू झाला. सावंगी रुग्णालयात त्याला नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनेची वार्ता शहरात आल्यावर एकच खळबळ उडाली.(तालुका प्रतिनिधी)