भोलेश्वरीच्या पात्राचे खोलीकरण रखडले
By Admin | Updated: June 20, 2015 02:36 IST2015-06-20T02:36:03+5:302015-06-20T02:36:03+5:30
येथील भोलेश्वरी नदीच्या पात्रात गाळ साचल्याने पात्र उथळ झाले आहे. यामुळे कमी प्रमाणात पाऊस झाला तरी नदीला पूर येतो.

भोलेश्वरीच्या पात्राचे खोलीकरण रखडले
रोहणा : येथील भोलेश्वरी नदीच्या पात्रात गाळ साचल्याने पात्र उथळ झाले आहे. यामुळे कमी प्रमाणात पाऊस झाला तरी नदीला पूर येतो. या नदीकाठावर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. यापूर्वी नदीला आलेल्या पुरात वित्तहानी व जीवितहानी झाली होती. यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी नवीन सोना यांनी नदीपात्राच्या खोलीकरणाचे संबंधित यंत्रणेला आदेश दिले होते. मात्र त्याची आजवर अंमलबजावणी झालेली नाही.
येथील नदीपात्राचे खोलीकरण झाले नसल्याने नदीकाठावर ज्यांची घरे आहेत त्यांना पुराचा धोका आहे. यामुळे येथील नागरिक अस्वस्थ झाले आहे. सन २०१२ च्या जुलै महिन्यात पावसाने हाहाकार उडाला. भोलेश्वरीचा पूर अर्ध्या गावापर्यंत शिरला होता. यात अनेक कुटुंबाची वाताहत झाली. शेकडो कुटुंबांना महिनाभर शिबिरात काढावे लागले. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी खुद्द जिल्हाधिकारी यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून नदीपात्राचे खोलीकरण करण्याचे आदेश दिले होते.
येथील नदीपात्राचे अद्याप खोलीकरण झाले नाही. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यानीही यासाठी १० लाख रुपये निधीची तरतूदही केली होती. पण या न त्या कारणाने सदर निधी परत गेला असल्याची माहिती आहे. तीन वर्षांचा काळ लोटला नदीपात्राचे खोलीकरण झाले नाही.
यापूर्वी पुराच्या घटना घडल्या असल्याने शासनाकडून खबरदारी घेण्यात येत नाही. गावातील गांधी वॉर्डात राहणाऱ्या लोकांना मोठा फटका बसतो. पावसाळा तोंडावर आले आहे. नदीपात्राचे खोलीकरण करणे शक्य आहे. पुराने होणारी वित्तहानी टाळण्यासाठी खोलीकरण आवश्यक आहे. शासकीय यंत्रणेने वेळ न दवडता भोलेश्वरीच्या पात्राचे खोलीकरण करुन भविष्यातील संभाव्य धोका टाळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.(वार्ताहर)