रबीतही राष्ट्रीय कृषी विमा योजनेचा लाभ
By Admin | Updated: November 9, 2014 23:17 IST2014-11-09T23:17:29+5:302014-11-09T23:17:29+5:30
रबी हंगामासाठी वर्धा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १०७ महसूल मंडळे याकरिता अधिसूचित करण्यात आलेली आहेत. महसूल मंडळांची यादी तालुका कृषी अधिकारी

रबीतही राष्ट्रीय कृषी विमा योजनेचा लाभ
वर्धा : रबी हंगामासाठी वर्धा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १०७ महसूल मंडळे याकरिता अधिसूचित करण्यात आलेली आहेत. महसूल मंडळांची यादी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. बऱ्हाटे यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत पिकाची पेरणी झाल्यापासून एक महिना किंवा जास्तीत जास्त ३१ डिसेंबरपैकी जे आधी असेल ती राहील. या योजनेंतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिकस्तरावर निश्चित करण्याची पद्धत जिल्ह्यातील सर्व अधिसूचित पिकांसाठी रब्बी २०१३-१४ हंगामात सर्व विमा अधिसूचित क्षेत्रात वाढविण्यात आलेली आहे.
पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिक आपत्तीमुळे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतलेला आहे. त्या संबंधीत वित्तीय संस्थेस किंवा भारतीय कृषी विमा कंपनीस नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त अधिसूचित पिकांची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्हा महसूल कार्यालयाच्या मदतीने नुकसान भरपाई करण्यात येणार आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचना व प्रपत्र सर्व बँकामध्ये उपलब्ध आहेत. राष्ट्रीय कृषी विमा योजना फायद्याची असल्याचे लाभ घ्यावा, असे बऱ्हाटे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)