१,७४८ शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:01 IST2018-03-02T00:01:00+5:302018-03-02T00:01:00+5:30
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सुक्ष्मसिंचन सुरू करण्यात आले. यंदा जिल्ह्यातील ७ हजार २९१ शेतकऱ्यांनी सुक्ष्मसिंचन संच बसविण्यासाठी आॅनलाईन अर्ज केले.

१,७४८ शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सुक्ष्मसिंचन सुरू करण्यात आले. यंदा जिल्ह्यातील ७ हजार २९१ शेतकऱ्यांनी सुक्ष्मसिंचन संच बसविण्यासाठी आॅनलाईन अर्ज केले. त्यापैकी ३ हजार ८१५ शेतकऱ्यांना आॅनलाईन पूर्व संमती देण्यात आली असून १ हजार ७४८ शेतकऱ्यांना ठिंबक संच खरेदीसाठी ३ कोटी ४२ लाख ६४ हजार रूपयाचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. यातून उत्पन्न वाढ करण्याचे ध्येय आहे.
पाण्याची बचत करण्याचा उद्देश यातून साध्य होणार आहे. कमीतकमी पाण्यात जास्तीत जास्तउत्पादन घेण्यासाठी प्रधानमंत्री यांनी ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ या विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (सुक्ष्मसिंचन) सुरू केली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सन २०१७-१८ करिता अल्प व अत्यल्प लाभार्थी शेतकºयांसाठी ५५ टक्के व इतर लाभार्थी शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यावर्षी भौतिक क्षेत्र मर्यादा ५ हेक्टर करण्यात आली आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ मार्च असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ३ हजार ८१५ शेतकऱ्यांना आॅनलाईन पूर्वसंमती देण्यात आली आहे. पूर्वसंमती प्राप्त शेतकºयांनी १५ दिवसाच्या आत सुक्ष्मसिंचन संच प्रत्यक्ष शेतात बसविणे आवश्यक आहे. यासाठी संचाची उभारणी केल्यानंतर वितरकांकडून संपूर्ण प्रस्ताव शेतकऱ्यांनी तयार करून अग्रीम देयके आॅनलाईन पध्दतीने प्रणालीवर अपलोड करणे गरजेचे आहे. तसेच संपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे. परंतु बरेचसे शेतकरी हे वितरकांवर अवलंबून राहतात. त्यामुळे प्रस्ताव वेळेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर होत नाही. त्यामुळे अनुदान मिळण्यास विलंब होतो. अनेकदा अनुदान न मिळाल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी वितरकांकडून केलेल्या कार्यवाहीबाबत जागरुक राहुन वेळेत प्रस्ताव सादर केल्यास अनुदान मिळण्यास विलंब होणार नाही, असे अधीक्षक भारती यांनी सांगितले.
मागील वर्षीच्या अर्जामध्ये काही शेतकऱ्यांचे खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड आॅनलाईन चुकीचा भरल्यामुळे अद्यापही सुमारे २०० प्रस्तावाचे अनुदान खात्यावर प्रलंबीत आहे. अशा शेतकऱ्यांनी सन २०१६-१७ चे अनुदान मिळण्यासाठी संपूर्ण बॅँक तपशील तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावा. यामुळे शेतकऱ्यांचे तांत्रिक अडचणीमुळे परत आलेले अनुदान बॅँक खात्यात जमा करता येईल, असे आवाहन भारती यांनी केले.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
जिल्ह्यात आतापर्यंत ८ कोटी ८० लाख रूपयांची पूर्व संमती देऊनही शेतकरी व वितरक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाले नाही. पूर्व संमती प्राप्त शेतकऱ्यांनी सुक्ष्मसिंचन संच बसविण्यासाठी प्रस्ताव त्वरीत सादर केल्यास मार्च २०१८ अखेर प्रस्तावाचे अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.