‘त्या’ दाम्पत्याला मिळणार श्रावणबाळ योजनेचा लाभ
By Admin | Updated: June 2, 2016 00:34 IST2016-06-02T00:34:53+5:302016-06-02T00:34:53+5:30
शासनाच्या योजना कितीही चांगल्या असल्या तरी जाचक अटीमुळे त्या कुचकामी ठरत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे.

‘त्या’ दाम्पत्याला मिळणार श्रावणबाळ योजनेचा लाभ
तहसीलदारांकडून वृत्ताची दखल
आकोली : शासनाच्या योजना कितीही चांगल्या असल्या तरी जाचक अटीमुळे त्या कुचकामी ठरत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. येथील एक वयोवृद्ध जोडपे निराधार असताना त्या जोडप्यावर भीक मागण्याची वेळ आली होती. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी दखल घेत त्या जोडप्याला श्रावण बाळ योजनेचा लाभ देण्याबाबत सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. हेटी येथील बलदेव अमरजीत वेधानी (७५) व पत्नी सुगंधी यांनी नावे दारिद्र्यरेषेखालील यादीत नसल्यामुळे त्यांनी सदर योजनेसाठी केलेला अर्ज नामंजूर झाला होता. हतबल व निराश झालेल्या या जोडप्याने हातात झोळी घेऊन भिक्षा मागण्याचे काम सुरू केले होते. मिळेल तिथे भाकर तुकडा खावून व झोळीत पडणाऱ्या धान्यावर त्यांना उदरनिर्वाह करावा लागत होता.
या जोडप्याची विदारकता लोकमतच्या बुधवारच्या अंकात प्रकशित झाली. याची दखल घेत तहसीलदार डॉ. होळी यांनी या जोडप्याच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती घेतल्याची माहिती आहे. शिवाय त्यांना श्रावणबाळ योजनेचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या. (वार्ताहर)
तलाठ्याचे गृहचौकशी अहवालाचे आधारे त्या वयोवृद्ध दाम्पत्याला श्रावणबाळ योजनेचा लाभ देण्यात येईल. तलाठ्याला तशा सूचना दिल्या जाईल. दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव नसले तरी काही हरकत नाही विशेष बाब म्हणून त्यांना अनुदान राशी देण्यात येईल.
डॉ. रवींद्र होळी,तहसीलदार, सेलू.