सौंदर्यीकरण अडकले प्रदूषणाच्या गर्तेत
By Admin | Updated: August 13, 2016 00:41 IST2016-08-13T00:41:56+5:302016-08-13T00:41:56+5:30
आॅपरेशन वॉश आऊट मोहिमेंतर्गत जप्त केलेल्या ड्रामांचा उपयोग वाहतूक सुरळीत करण्यासाठी होत आहे.

सौंदर्यीकरण अडकले प्रदूषणाच्या गर्तेत
आर्वी नाका चौकात सर्वत्र प्लास्टिकच्या चिंध्या : पालिकेने कठोर कारवाई करण्याची गरज
वर्धा : आॅपरेशन वॉश आऊट मोहिमेंतर्गत जप्त केलेल्या ड्रामांचा उपयोग वाहतूक सुरळीत करण्यासाठी होत आहे. या ड्रामांच्या सभोवताल काही संघटनांनी काही दिवसांपूर्वी जाहिरीती लावल्या तर प्लास्टिक गुंडाळले. आजघडीला या जाहिराती व प्लास्टिकच्या चिंध्या झाल्या आहेत. त्यामुळे आर्वी नाका चौकाचे विद्रूपिकरण होत आहे.
शहरातील महत्वाचा चौक असलेल्या आर्वी नाका चौकातही ड्राम ठेवण्यात आले. या ड्रामांचा उपयोग वर्षभरापूर्वी काही समाजसेवी संघटनांनी कल्पकतेने करीत सदर ड्रामांवर जनजागृतीपर संदेशाचे फलक लावले. परंतु रामनवमी उत्सवात काही धार्मिक संघटनांनी सदर ड्रामांवर पूर्णपणे भगव्या रंगाचे प्लास्टिक गुंडाळले. त्यामुळे चौकाला काहीशी शिस्तबद्धता आली. परंतु हळूहळू प्लास्टिकचा रंग उडायला लागला. उन्ह, वारा यामुळे प्लास्टिक फाटून त्याचे तुकडे इतरत्र पसरू लागले. आजही हा प्रकार आर्वी नाका परिसरात सुरू आहे. त्यामुळे या चौकाचे विद्रूपिकरण होत आहेच पण प्लास्टिक इतरत्र पसरून प्रदूषणही होत आहे.
ज्या संघटनेने असे प्लास्टिक ड्रामांना गुंडाळले त्यांना तर प्रदूषणाचा मुद्दा गावीही नसेल. त्यामुळे पालिकेनेचे पुढाकार घेत प्लास्टिक काढून यानंतर असे प्लास्टिक गुंडाळण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे. तशी मागणीही नागरिकांद्वारे होत आहे.(शहर प्रतिनिधी)
प्लास्टिक फाटून पसरली लक्तरे
रामनवमीला आर्वी नाका चौकातील ड्रामांना एका संघटनेद्वारे भगव्या रंगाचे प्लास्टिक गुंडाळण्यात आले. अल्पावधीतच उन्हामुळे सदर प्लास्टिकचा रंग उडून ते फाटायला लागले. खरे पाहता रामनवमी उत्सव संपल्यावर सदर संघटनेने प्लास्टिक स्वत:च काढून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे होते. असे न झाल्यामुळे सदर प्लास्टिक फाटून त्याची लक्तरे रस्त्यांवर लोंबकळत आहे. प्लास्टिक पुढे जाऊन खराब होऊन प्रदूषण होईल हा मुद्दा संघटनेच्या कार्यकत्यांनी लक्षात घेतला नाही. तसेच पालिकेची परवानगी घेतली का हा मुद्दाही उपस्थित होत आहे.