जागेच्या वादात रखडले स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण
By Admin | Updated: November 2, 2015 01:43 IST2015-11-02T01:43:20+5:302015-11-02T01:43:20+5:30
पुलगाव शहरालगत वर्धा नदीच्या काठावर दशकांपूर्वीपासून पंचधारा स्मशानभूमी आहे.

जागेच्या वादात रखडले स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण
पुलगाव येथील प्रकार : अंत्ययात्रेस जाणाऱ्या नागरिकांना त्रास
वर्धा : पुलगाव शहरालगत वर्धा नदीच्या काठावर दशकांपूर्वीपासून पंचधारा स्मशानभूमी आहे. शहरासह परिसर व दारूगोळा भांडारातील मृतकांच्या पार्थिवावर येथेच अंत्यसंस्कार केले जातात. या स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण व्हावे, येथे अद्यावत सुविधा मिळाव्या म्हणून दोन कोटी रुपये खर्चाचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे; पण दारूगोळा भांडाराने जमिनीवर हक्क दाखविल्याने सौंदर्यीकरणाचे काम रखडले. यामुळे अंत्यविधी करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़
स्थानिक पंचधारा स्मशानभूमीत अद्यावत सुविधा नसल्या तरी कित्येक दशकांपासून गावाशेजारची स्मशानभूमी म्हणून याकडे पाहिले जाते. या स्मशानभूमीत प्राचीन भोसले कालीन शिवमंदिर व मंदिराच्या शेजारीच एक हनुमान मंदिर आहे. दशकापूर्वी या स्मशानभूमीत खासदार रामदास तडस यांच्या स्थानिक विकास निधीतून पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी तीन शेड व सोबतच नागरिकांना बसण्यासाठी एक मोठे टीनशेड उभारण्यात आले होेते. आतापर्यंत त्यातच अंत्यसंस्कार करण्यात येत होते; पण अलीकडे स्मशानभूमीच्या सांैदर्यीकरणाचा आराखडा माजी मंत्री आमदार रणजीत कांबळे यांच्या प्रयत्नाने दोन कोटी रुपये खर्चाचा आराखडा आखण्यात आला. सौंदर्यीकरणाचे बांधकामही सुरू करण्यात आले़ यात अंत्यसंस्कारासाठी तीन शेड व विद्युत दाहिनी यासह नागरिकांना बसण्यासाठी शेड, प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, प्रसाधनगृह, पक्के रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदींचा समावेश करण्यात आला.
या सौंदर्यीकरणाच्या कामास सुरूवात होऊन सुमारे अर्धे बांधकामही करण्यात आले. यानंतर अचानकच दारूगोळा भांडार प्रशासनाने जागेवर हक्क दाखवून काम थांबविले; पण या जागेच्या वादात अंत्यसंस्कारास येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात बांधकामाचे साहित्य पसरलेले आहे. बसण्यासाठी शेड नाही. संरक्षक भिंंतीमुळे नदीच्या पात्रात जाणे कठीण झाले आहे. या परिसरात कुठेही मोठे वृक्ष नाही. त्यामुळे उन्ह व पावसाचा मारा नागरिकांना सहन करावा लागणार आहे. शिवाय हनुमान मंदिराजवळच बांधण्यात येत असलेल्या प्रसाधन गृहाबाबत नागरिकांद्वारे नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या हा वाद जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. या टाळाटाळीमध्ये नागरिकांना मात्र कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)