राजकीय अनास्थेत अडले रस्ता सौंदर्यीकरण

By Admin | Updated: July 4, 2015 00:26 IST2015-07-04T00:26:39+5:302015-07-04T00:26:39+5:30

येथील मुख्य रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी आघाडी सरकारच्या काळात सुमारे दीड कोटी रुपये मंजूर होऊन सदर कामाचे आदेशही काढण्यात आले आहेत.

Beautification of Adale Road in the state | राजकीय अनास्थेत अडले रस्ता सौंदर्यीकरण

राजकीय अनास्थेत अडले रस्ता सौंदर्यीकरण

कामाकरिता दीड कोटी रुपये मंजूर : दोन वर्षांपूर्वीच निघाले कामाचे आदेश
नाल्याच्या अरूंद पुलामुळे वाहतुकीचा खोळंबा कायम
सुधीर खडसे समुद्रपूर
येथील मुख्य रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी आघाडी सरकारच्या काळात सुमारे दीड कोटी रुपये मंजूर होऊन सदर कामाचे आदेशही काढण्यात आले आहेत. युतीचे शासन आल्यानंतर रस्त्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाबाबत लोकप्रतिनिधींची अनास्था असल्याने कामाचे भवितव्य अधांतरी आले आहे.
आघाडी शासनाच्या काळात शहरांतर्गत असलेल्या एक किलोमिटर रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ७ फेब्रुवारी २०१३ रोजी मंजूर करण्यात आला. येथील या रकमेत येथील विश्रामगृह ते पोलीस ठाण्यापर्यंतचा १५ मिटर रूंदीचा व एक किलोमिटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार होता. या रस्त्याच्या मधोमध १.२० मिटर रूंदीचे दुभाजक निर्माण करण्यात येणार होते.
शहराच्या मध्यभागी असलेल्या लेंडी नाल्यावरील पुलाचे बांधकाम करणे आदी बाबींचा या कामामध्ये समावेश होता. रस्त्याची रूंदी वाढविण्यासाठी ६२ लाख ३३ हजार ६०६ रुपये, दुतर्फा नाली बांधकामासाठी २४ लाख १० हजार ५३ रुपये, रस्ता दुभाजकाकरिता ८ लाख ८० हजार ९७१ रुपये, विजेचे खांब हटविण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये तर रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्यासाठी १ लाख रुपये पुलाच्या बांधकामासाठी ४ लाख रुपये, संगणकीकरणाकरिता १ लाख ९० हजार ४९३ रुपये व इतर आवश्यक बाबींसह या कामाचे १ कोटी ४४ लाख रुपये किमतीचे प्राकलन मंजूर झाले आहे. या कामाचे आदेश देवून दोन वर्षांचा कालावधी होऊनही प्राकलनानुसार अद्याप काम झाले नाही.

शहराच्या मधोमध असलेल्या नाल्याला पूर येत असल्याने पावसाळ्यात तासनतास वाहतूक ठप्प होते. या नाल्यावर उंच पूल होणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु सदर रस्त्याच्या कामा अंतर्गत या पुलाच्या बांधकामासाठी संबंधित विभागाकडून कोणत्याच हालचाली होतांना दिसत नाही. यामुळे नव्या शासनाच्या काळात हा रस्ता पूर्ण होईल अथवा नाही या बाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

रस्ता रूंदीकरणाच्या नावावर वृक्षांची कत्तल
या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या नावावर शहरातील सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची मोठ-मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली. यामुळे रस्त्यावर भकासपणा आला आहे. शेकडो वृक्षांचा बळी देण्यात आला मात्र रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे पोल काढण्यात आले नाही. यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. यामुळे काही अपघातही झाले आहेत.

पुलाचे काम, विजेचे पोल काढण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. रस्त्याच्या कामात रूंदी कमी करून लांबी वाढविण्यात आली. यामुळे रस्त्याची लांबी ४१० मीटर तर रूंदी ११ मीटर झाली आहे. रूंदी कमी झाल्याने दुभाजक होणार नाही.
- एस. बी. गबने, कनिष्ठ अभियंता
बांधकाम विभाग, समुद्रपूर

Web Title: Beautification of Adale Road in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.