शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला
By Admin | Updated: August 2, 2016 01:06 IST2016-08-02T01:06:35+5:302016-08-02T01:06:35+5:30
तालुक्यातील जंगलव्याप्त भागात असलेल्या अस्वलामुळे शेतकरी भयग्रस्त झाले आहेत. यातच

शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला
आष्टी (शहीद) : तालुक्यातील जंगलव्याप्त भागात असलेल्या अस्वलामुळे शेतकरी भयग्रस्त झाले आहेत. यातच सोमवारी दुपारी तालुक्यातील मोई येथील प्रल्हाद झिताजी पवार (४५) यांच्यावर अस्वलाने हल्ला चढविला. यात सदर शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. हा दुसरा हल्ला असून सदर घटना तळेगाव वनक्षेत्र अंतर्गत बोटोणा बीटमध्ये घडली. शेतकऱ्यांनी या अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाला केली होती; मात्र त्यांच्याकडून काहीच कार्यवाही झाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक दिली.
मुबारकपूर हा भाग तळेगाव (श्यामजीपंत) येथील वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येतो. मात्र या कार्यालयात अधिकारी नसल्याने आष्टी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. परिहार, बीटरक्षक एस.सी. सावंत यांनी त्याला १० हजार रुपयांची प्राथमिक स्वरुपाची मदत देत उपचाराकरिता नागपूर येथे रवाना केले.
प्रल्हाद पवार हे शेतात कामासाठी गेले असता अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात तो ६० टक्के जखमी झाले. अस्वलाने त्याच्या पाठीच्या भागाचे अक्षरश: लचके तोडले. त्याच्या डोक्यालाही गंभीर इजा झाल्या आहेत.
जखमी अवस्थेत प्रल्हादला कारंजा येथील रूग्णालयात भरती केले. प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथे हलविण्यात आले. सदर घटना तळेगाव वनक्षेत्र अंतर्गत बोटोणा बीटमध्ये घडली. मात्र आष्टी वनक्षेत्र लागून असल्याने आष्टी वनाधिकाऱ्यांनी तात्काळ उपाय केले. याप्रकरणी मोई गावातील संतप्त शेतकऱ्यांनी आष्टी वनविभगाचे कार्यालय गाठून चांगलाच राडा घातला. ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अस्वलाच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. वनविभागाने या अस्वलाचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.(प्रतिनिधी)
गत आठवड्यात आष्टी तालुक्यातील माणिकवाडा या गावातील एका गुराख्यावर अस्वलाने तिच्या पिलासोबत हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या त्या गुराख्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या हल्ल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने पूर्वीच उजेडात आणले होते. असे असताना वनविभागाकडून या अस्वलाचा अद्याप बंदोबस्त करण्यात आलेला नाही.