बी.ई. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोळ
By Admin | Updated: September 22, 2014 23:25 IST2014-09-22T23:25:23+5:302014-09-22T23:25:23+5:30
अभियांत्रिकीतील काही विद्यार्थ्यांना सत्र २०१२-१३ मधील शिष्यवृत्ती अद्यापही मिळालेली नाही. शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालयात तक्रार दिली. वारंवार चकरा मारल्या

बी.ई. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोळ
वर्धा : अभियांत्रिकीतील काही विद्यार्थ्यांना सत्र २०१२-१३ मधील शिष्यवृत्ती अद्यापही मिळालेली नाही. शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालयात तक्रार दिली. वारंवार चकरा मारल्या पण विभागाकडून विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात आली. काही विद्यार्थ्यांना एका सत्रात दोनदा शिष्यवृत्ती मिळाली तर काहींना अद्याप शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे. याची चौकशी करून वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी ए.आय.एस.बी. यांनी निवेदनातून केली आहे.
या निवेदनानुसार, समाजकल्याण कार्यालयातील शिष्यवृत्ती विभागाकडून तक्रारीची दखल घेतली जात नाही. वरिष्ठ अधिकारी याबाबत अनभिज्ञ असतात. यामुळे समस्या कायम असून तक्रार करुन विद्यार्थी त्रस्त झाले आहे. तक्रार करण्यास गेले असता कार्यालयातील कर्मचारी टोलवाटोलवी करतात. तुम्ही कॉलेज मध्ये विचारा असे सांगितले जाते. विद्यार्थी याची विचारणा कॉलेजमध्ये करतात तर त्यांना समाजकल्याण येथे जाण्यास सांगितले जाते. सततच्या हेलपाटामुळे विद्यार्थी निराश झाले आहेत. त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. तर काही विद्यार्थ्यांना एका सत्रात दोनदा शिष्यवृत्ती मिळाली. या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी आॅल इंडिया स्टुडंट ब्लॉक पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण सहआयुक्त देशमुख तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांच्याकडे निवेदनातून केली. यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. काही विद्यार्थ्यांना दोन, तिनदा शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे अन्य विद्यार्थी वंचित राहिले. त्यामुळे ज्यांना एका सत्रात दोनदा शिष्यवृत्ती मिळाली त्यांच्या खात्यातील रक्कम वळती करणे शक्य नाही. मात्र वंचित विद्यार्थ्यांकरिता वेगळ्या निधीची तरतूद करण्याची मागणी या चर्चेत करण्यात आली. यासह एकाच विद्यार्थ्यांच्या खात्यात अनेकदा पैसे जमा होतातच कसे, असे होत असेल तर ही चुकी कुणाची, यात काही साटेलोटे आहे काय चौकशी केली जावी. याची चौकशी करण्यात दिरंगाई केल्यास समाजकल्याण आयुक्तांनी याचे उत्तर द्यावे, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
आॅल इंडिया स्टुंडटस ब्लॉक संबंधित प्रशासनाकडे निवेदनाची प्रत दिली आहे. आठ दिवसात जर या वंचीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही तर आॅल इंडिया स्टुंडटस ब्लॉक यांचाकडून मागणीकरिता आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. चर्चा करताना शिष्टमंडळात तुषार उमाळे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)