सावधान ! बोगस बीटी बियाणे बाजारात
By Admin | Updated: May 30, 2016 01:46 IST2016-05-30T01:46:22+5:302016-05-30T01:46:22+5:30
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यात बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याने त्यांची फसवणूक करण्याकरिता अनेक बोगस कंपन्यांची बियाणे बाजारात येत आहेत.

सावधान ! बोगस बीटी बियाणे बाजारात
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यात बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याने त्यांची फसवणूक करण्याकरिता अनेक बोगस कंपन्यांची बियाणे बाजारात येत आहेत. वर्धेत तशी बियाणे येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सतर्कता बाळगण्याचा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून बियाण्यांच्या खरेदीकरिता धावपळ सुरू होत आहे. अशात काही बोगस कंपन्या आपली तुमडी भरण्याकरिता शेतकऱ्यांची फसवणूक करण्यास मागे राहत नाही. वर्धेतही तशी बियाणे दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला मिळाली आहे. यात सर्वाधिक बियाणे कपाशीची राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाशक्ती, आर. आर. बीटी किंवा बी जी ३ या नावाने बोगस बियाणे बाजारात येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावधान राहण्याचे कळविले आहे.
जिल्ह्याला हवी बीटी बियाण्यांची १० लाख पाकिटे
कपाशीच्या अपेक्षित पेरणीच्या नियोजनानुसार जिल्ह्याला बीटी कापूस बियाण्यांच्या १० लाख ८ पाकिटाची आवश्यकता आहे. आता पर्यंत जिल्ह्यात ६ लाख ६६ हजार पॉकिटाचा पुरवठा झालेला आहे. पेरणीच्या वेळापर्यंत मागणी प्रमाणे पुरवठा होणार असून कपाशी बियाण्याचा तुटवडा व टंचाई जाणवणार नाही, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस. एम. खळीकर यांनी कळविले आहे.
जिल्ह्यामध्ये सोयाबीनची बियाणे उपलब्ध होणार
१ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनच्या पेरणीचे नियोजन असल्याचा आराखडा कृषी विभागाने तयार केला आहे. त्याकरिता ५७ हजार ७५० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक व खासगी कंपनीचे ६० हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
सोयाबीन पेरताना सहा ओळीनंतर एक ओळ तूर ठेवा
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये म्हणून यंदाच्या हंगामात सोयाबीनची पेरणी करताना सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्यांनी ६ ओळी नंतर एक ओळ तूर या प्रमाणे आंतरपीक घेण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल व आपातकालीन परिस्थितीत तूर आंतरपीक घेतल्यामुळे फायदाही होईल, असे कृषी तज्ज्ञांकडून कळविण्यात आले आहे. मान्यताप्राप्त कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करा
मागणीच्या तुलनेत बिटीची कमी पाकिटे
वर्धा : बियाण्यांबाबत होत असलेली फसगत टाळण्याकरिता जिल्ह्यात कृषी विभागाकडून मान्यताप्राप्त असलेल्या दुकानांकडून बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कृषी विभागाकडून मान्यता असलेले एकूण ८५० दुकाने असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. बियाण्यांची, खतांची व किटकनाशकांची खरेदी करताना ती सीलपॅक आहेत अथवा नाहीत, याची तपासणी करावी. यात कुणी दुकानमालक कुचराई करीत असेल तर त्याची तक्रार कृषी विभागाकडे करावी, असेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)