मतदानाचा वाढलेला टक्का कोणत्या पक्षाच्या पथ्यावर
By Admin | Updated: February 17, 2017 02:11 IST2017-02-17T02:11:28+5:302017-02-17T02:11:28+5:30
पक्षांना ही निवडणूक अस्तित्वाची असल्याने मतदार मतदान केंद्राकडे पोहोचते करण्याचा प्रयत्न झाला.

मतदानाचा वाढलेला टक्का कोणत्या पक्षाच्या पथ्यावर
टक्का वाढला : उमेदवार व कार्यकर्त्यांतही होता उत्साह
कारंजा (घा.) : पक्षांना ही निवडणूक अस्तित्वाची असल्याने मतदार मतदान केंद्राकडे पोहोचते करण्याचा प्रयत्न झाला. परिणामी, दुपारी ३ वाजेपर्यंतच ६३,१५१ पैकी ३४,५३४ मतदारांनी मतदान केले. दुपारीच ५५.९८ टक्के मतदान झाल्याने सायंकाळपर्यंत ७५ टक्केपेक्षा अधिक मतदान होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
नवीन चेहरे, स्वच्छ प्रतिमेचे व विकास साधणारे उमेदवार अपेक्षित असताना भाजपा व काँगे्रसला तसे उमेदवार देता आले नाही. यामुळे रिंगणात असलेल्या दिग्गज उमेदवारांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली. भाजपामध्ये काँग्रेसपेक्षा अधिक बंडखोरी झाली. भाजपाचे बंडखोर उमेदवार मूळ उमेदवारापेक्षा प्रभावी राहिले. यामुळे काही गट, गणात भाजपला मार बसेल तर काँग्रेसला फायदा होईल, असा अंदाज आहे.
पारडी गटात काँग्रेसचे माजी सभापती मेघराज चौधरी यांनी भाजपच्या सुरेश खवशी यांना काट्याची टक्कर दिली. खवशी कुटुंबात दोनदा जि.प. सदस्य पद होते; पण कामे न झाल्याने नाराजीचा सूर होता. तुलनेत काँग्रेसला अंतर्गत विरोध कमी होता. अपक्षांचा अधिक जोर नसल्याने थोड्या मतानेच विजय मिळविता येणार असल्याचे दिसते.
सिंदीविहिरी गटात भाजपच्या माजी उपसभापती रेवता धोटे, काँगे्रसच्या चंदा घाडगे व अपक्ष प्रमिला ढोले यांच्यात तिहेरी लढत झाली. भाजपा व अपक्षांच्या भांडणाचा काँग्रेसला फायदा होईल, असे बोलले जाते. कन्नमवारग्राम गटात भाजपाच्या सरीता गाखरे व काँग्रेसच्या निलीमा व्यवहारे यांच्यात सरळ लढत होणार, असे चित्र होते; पण भाजपाचे सोमराज तेलखेडे यांनी पत्नीला मैदानात उतरवून लढतीत रंगत आणली. तेलखेडे यशस्वी झाल्यास या गटात आश्चर्यकारक निकाल लागण्याची शक्यता आहे.
नारा पं.स. गणात भाजपाचे बाबा मानमोडे व काँग्रेसचे टिकाराम घागरे यांच्यात लढत झाली. बाबा मानमोडेच्या पत्नी वर्धा जि.प.च्या सभापती आहे तर टिकाराम घागरे यांनी अनेक पदे उपभोगली आहे. या जि.प. गटात भाजपाचे पारडे जड असल्याचे बोलले जाते. ठाणेगाव गणात भाजपाच्या पुष्पा जीवन चरडे, प्रतिभा बोडखे (अपक्ष) व काँग्रेसच्या मालीनी पठाडे यांच्यात लढत झाली. माजी जि.प. सभापती शेषराव चरडे यांची सून पुष्पा चरडे बाजी मारतील, अशी चर्चा आहे. अपक्ष उमेदवारामुळे राजकीय समिकरण बिघडले. कुंडी गणात काँग्रेसच्या रेखा डोंगरे, अपक्ष ललीता देवासे व भाजपाच्या रोशन ढोबाळे यांच्यात तिहेरी सामना झाला. कन्नमवारग्राम गटात भाजपाच्या आम्रपाली बागडे व काँग्रेसच्या इंदिरा गजभीये यांच्यात सामना रंगला. पारडी गणात भाजपाच्या रंजना टिपले, काँग्रेसच्या माया इरखेडे व अपक्ष राखी पाटील यांच्यात सामना रंगला; पण मोहन टिपले यांच्या निधनाची सहानुभूती रंजना यांना मिळण्याची शक्यता आहे. सेलगाव उमाटे गणात भाजपाचे मंगेश खवशी व काँग्रेसचे तेजराव बन्नगरे यांच्यात झूंज झाली.(तालुका प्रतिनिधी)