पाणीपुरवठा योजनेच्या लिकेजचा आधार
By Admin | Updated: April 23, 2016 02:08 IST2016-04-23T02:08:55+5:302016-04-23T02:08:55+5:30
जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमाणामुळे पाण्याची पातळी खालावत आहे.

पाणीपुरवठा योजनेच्या लिकेजचा आधार
पाण्याचा असाही वापर : फुटलेल्या व्हॉल्व्हवरून समता नगरवासीय भागवितात तृष्णा
वर्धा : जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमाणामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. यामुळे नळयोजनेला पाणी येत नाही. पाण्याच्या थेंबाथेंबाकरिता नागरिकांची परवड होत आहे. याच पाण्याचा थेंब अन् थेंब कामी यावा याकरिता पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेल्या वरूड-म्हसाळा मार्गावरील समता नगर आणि गौतम नगर परिसरातील नागरिक पाणी पुरवठा योजनेच्या एयर व्हॉल्व्हच्या लिकेजमधून वाया जात असलेल्या पाण्यावर आपली गरज भागवत आहेत.
या भागात नळ शासनाची नळ योजना असली तरी सध्या पाण्याच्या दूर्भिक्ष्यामुळे नळांना अपुरे पाणी येत आहे. आलेल्या पाण्यात नित्याची गरज भागत नाही. यामुळे या भागात पाण्याकरिता भटकंती सुरू आहे. पवनार येथून सेवाग्राम परिसरात गेलेल्या नळ योजनेच्या व्हॉल्व्हमधून पाणी लिकेज होत असल्याने नागरिक येथे पाणी भरण्याकरिता गर्दी करीत आहे. उन्हाचे चटके जाणवत असताना भर दुपारी सूर्य माथ्यावर असताना २ वाजताच्या सुमारास या भागातील महिला पुरूष पाण्याकरिता या लिकेज व्हॉल्व्हजवळ गर्दी करीत असतात. सायंकाळच्यावेळी तर येथे चांगलीच झुंबड उडत असल्याची माहिती आहे.
व्हॉल्व्ह मधील पाणी थेट आपल्या बादलीत पडावे, याकरिता त्यांनी प्लास्टिकची थैली बांधून त्यातून पाणी घेण्याची शक्कल येथे लढविली आहे. यातून पाणी घेत या भागातील नागरिक त्यांची पाण्याची गरज भागवित आहेत. या भागात नळ योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा अत्यल्प असल्याने शासनाने येथे पाणी पुरवठा करण्याकरिता उपाययोजना आखण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)