श्रमजीवींना एसडीओंच्या निवासस्थानाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:07 IST2019-02-20T00:04:38+5:302019-02-20T00:07:11+5:30
ना हक्काचे घर... ना डोक्यावर सावली... वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस उजाडताच कामाची लगबग सुरु होते; पण सध्या सूर्यनारायणही तळपत असल्यामुळे थकलेल्या श्रमजिवींनी आपला थकवा भागविण्यासाठी चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या अंगणातील सावलीतच वामकुशी घेतली.

श्रमजीवींना एसडीओंच्या निवासस्थानाचा आधार
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ना हक्काचे घर... ना डोक्यावर सावली... वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस उजाडताच कामाची लगबग सुरु होते; पण सध्या सूर्यनारायणही तळपत असल्यामुळे थकलेल्या श्रमजिवींनी आपला थकवा भागविण्यासाठी चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या अंगणातील सावलीतच वामकुशी घेतली. सध्या या निवासस्थानात अधिकारी राहात नसले तरी हे निवासस्थान आज श्रमजिवींकरिता आधार ठरले आहे.
‘मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया’ चा गवगवा केला जात असताना आजही या देशात पोट भरण्यासाठी काही समाजांची भटकंती सुरूच आहे. मिळेल ते काम करीत, वाट्टेल तेथे आडोसा घेत; हा मिळालेला मानवाचा देह जगविण्याची धडपड सुरू आहे. वर्ध्यात सध्या रस्त्याच्या सिमेंटीकरण व रुंदीकरणाची कामे सुरु असल्याने परप्रांतीय मजूर शहरात दाखल झाले आहे. पहाटेपासूनच त्यांच्या कामाला सुरुवात होत असून रात्री उशिरापर्यंत ते तान्हुल्यांसह कामात व्यस्त असतात. शहरातील झाशी राणी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. या कामातही मजूर सकाळपासूनच राबतात दिसतात. सिमेंटीकरण व रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगतची अनेक डौलदार झाडे तोडल्याने सावलीही हिरावली. आता उन्हाळ्याची चाहूल लागल्याने या मजुरांनाही थोडासा विसावा घेण्यासाठी सावलीची गरज भासू लागली.
त्यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या उपविभागीय अधिकाºयांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारातील झाडांचा आधार घेतला. तेथेच आपले थकले, क्षीण झालेले शरीर टेकवून वामकुशी घेतली. विशेषत: या शासकीय निवासस्थानी दुरुस्ती करण्यात आल्याने अद्याप कोणतेही अधिकारी येथे राहायला आले नाही. त्यामुळे या मजुरांना येथे विसावा घेण्याची सोय झाली. अन्यथा त्यांना रस्त्याच्या कडेला कुठेतरी सावलीचा आधार घेत वेळ निभावून न्यावी लागली असती. पण, या श्रमजिवींचा आजचा हा विसावा त्यांचा श्रमपरिहार करणाराच ठरला असावा.