अनुराधा पौडवाल गाणार बापूंची आवडती भजने
By Admin | Updated: January 29, 2015 23:12 IST2015-01-29T23:12:03+5:302015-01-29T23:12:03+5:30
महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी स्वच्छ भारत

अनुराधा पौडवाल गाणार बापूंची आवडती भजने
वर्धा : महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल बापूंना आवडत्या भजनातून संगीतमय आदरांजली अर्पण करणार आहे.
स्वच्छतेचे महत्त्व प्रत्येक घरापर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे सेवाग्रामसह स्वच्छ वर्धा या संकल्पनेची सुरुवातही सेवाग्रामातून शुक्रवारपासून होत आहे. यात सकाळी ९ वाजता भक्तीसंगीतचा कार्यक्रम आयोजित आहे.
महात्मा गांधी यांचे सेवाग्राम येथे १२ वर्षे वास्तव होते. याच काळात भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सेवाग्राम हे देशातील प्रमुख केंद्र बनले होते. कुटीरोद्योगाच्या माध्यमातून गावाचा विकास तसेच स्वच्छतेचा संदेशही महात्मा गांधी यांनी येथूनच दिला असल्यामुळे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी सांस्कृतिक केंद्रातर्फे भक्ती संगीत तसेच स्वच्छ वर्धा अभियानाचे सुरुवात करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केंद्र संचालक डॉ. पियुष कुमार यांनी दिली. पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचे भजनगायन वर्धेकरांना अनुभवता येणार आहे. त्या सकाळी ९.३० ते ११ या वेळेत महात्मा गांधीजींना प्रिय असलेल्या भजनांचे गायन करतील. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सकाळी ११ वाजता स्वच्छ वर्धा अभियानाचे उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)