अखंड सूत कताईतून बापूंना आदरांजली
By Admin | Updated: October 3, 2015 01:48 IST2015-10-03T01:48:22+5:302015-10-03T01:48:22+5:30
देशाकरिता पे्ररणा स्थळ ठरत असलेल्या सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली अर्पण करण्यात आली.

अखंड सूत कताईतून बापूंना आदरांजली
दिवसभर भरगच्च कार्यक्रम : सुधीर मुनगंटीवार यांची आश्रमात प्रार्थना
वर्धा : देशाकरिता पे्ररणा स्थळ ठरत असलेल्या सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली अर्पण करण्यात आली. आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने नित्याप्रमाणे पहाटेपासून अखंड सूत कताईला प्रारंभ झाला. यात आश्रमच्या साधकांसह विदेशी पर्यटक व जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदविला. यात सायंकाळपर्यंत २६ हजार मिटर सूतकताई करण्यात आल्याची नोंद झाली आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त ना. मुनगंटीवार यांनी सेवाग्राम आश्रमात जाऊन बापू कुटीचे दर्शन घेतले. तसेच बापू कुटीत प्रार्थनेत सहभागी होत महात्मा गांधी यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
‘मेरा जीवन ही मेरा संदेश है’ या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदेशाचे अनुकरण करा. तसेच जनतेची सेवा करण्याचा संकल्प करा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ना. मुनगंटीवार यांनी सेवाग्राम आश्रमात जावून बापूकुटीचे दर्शन घेतले. तसेच बापू कुटीत प्रार्थनेत सहभागी होत महात्मा गांधी यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
‘वैष्णव जन तेने कहिये जो पिर पराई जानी रे’ हे भजन तसेच ‘रघुपती राघव राजाराम’ आदी नामधुनचे सामूहिक प्रार्थनेचे गायन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सेवाग्राम परिसरात गांधी विचारवंत, देश व विदेशातील नागरिक विविध संघटना आदींनी भेट देवून महात्मा गांधीना आदरांजली अर्पण केली.
आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी ना. मुनगंटीवार यांचे ‘गिताई’ हा ग्रंथ भेट देवून स्वागत केले. आश्रम परिसरात सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, उपउपविभागीय अधिकारी स्मीता पाटील, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव श्रीराम जाधव व विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी वर्धा जिल्ह्याचे खा. रामदास तडस यांनी बापू कुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना करून बापूंना आदरांजली अर्पण केली.
गांधी जयंतीनिमित्त पहाटे गावातून रामधून काढण्यात आली. यात आश्रम प्रतिष्ठानचे साधक सहभागी झाले होते. यानंतर नित्याप्रमाणे पहाटे प्रार्थना करण्यात आली आहे. या प्रार्थनेत जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा विविध शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनात्मक पथनाट्यही सादर केले. यातून त्यांनी समाजात असलेल्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. तर येथे आलेल्या विदेशी पर्यटकांनी देशात शांती निर्माण करण्याकरिता महात्मा गांधी यांच्या विचाराची कास धरण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. सकाळपासून आश्रमात गर्दी होती. देश, विदेशातील दर्शनार्थी तसेच शाळा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यांच्यासह बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. नई तालिम परिसरात सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)
अंतरमनातून बापूंशी संवाद साधून पे्ररणा घ्या- अभय बंग
सेवाग्राम - गांधीजींप्रमाणे ध्येय बाळगून समाज व राष्ट्राची सेवा करणारे दृष्टीस पडत नाहीत. काशी व मक्का हे ज्याप्रमाणे प्रवित्र श्रद्धा स्थान आहेत तसेच सेवाग्राम आश्रमही आहे. येथे बसून आपल्या अंतरमनातून बापूंशी संवाद साधून प्रेरणा घेण्याचे आवाहन शोधग्राम सर्चचे डॉ. अभय बंग यांनी केले.
आश्रमात गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी गांधी विचार परिषदचे भरत महोदय तर अतिथी म्हणून आश्रम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष अॅड. मा.म. गडकरी उपस्थित होेते. तर मार्गदर्शक म्हणून डॉ. अभय बंग व आश्रमचे अध्यक्ष जयवंत मठकर व मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव उपस्थित होते. डॉ. बंग म्हणाले, गांधीजींनी खादी आणि कृष्ठरोगी सेवेचे काम याच आश्रमातून सुरू केले. संत विनोबांनी गोवंश हत्या बंदीसाठी तर उपोषणही केले होते. अध्यक्षीय भाषण महोदय यांनी केले.
अखंड सूत्रयज्ञात २६ हजार मीटर सूत कताई
जागतिक स्तरावरील प्रसिद्ध असलेल्या महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमात गांधीजींच्या १४६ व्या जयंतीनिमित्त अखंड सूत्रयज्ञाने बापूंना आदरांजली वाहण्यात आली.
आश्रमात पहाटे ५.४५ वाजता घंटीघर ते बापूकुटी अशी रामधून प्रभात फेरी काढण्यात आली. बापूकुटी प्रांगणात प्रार्थना झाल्यानंतर सकाळी ६ वाजता अखंड सूत्रयात्राला प्रारंभ झाला. सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपर्यंत प्रार्थनाभूमीवर सामूहिक सूतकताई करण्यात आली. सायंकाळी नित्याप्रमारणे प्रार्थना झाली. रात्रीला आदी निवासाच्या वऱ्हाड्यांमध्ये सर्वधर्म भजन व गीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी आश्रम प्रतिष्ठानचे सर्व साधक, नई तालीम समितीचे कार्यकर्ता, गांधी प्रेमी, विदेशी पर्यटक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जलयुक्त वर्धा’ पुस्तिकेचे विमोचन
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील २१४ गावामध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांवर आधारित यशोगाथा असलेल्या जलयुक्त वर्धा या पुस्तिकेचे विमोचन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन, वर्धेच्या उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील व सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी तथा जलयुक्त शिवार समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.