बँकांनी कर्ज वाटपाची गती वाढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 22:31 IST2018-08-02T22:31:02+5:302018-08-02T22:31:30+5:30
शंभर कोटी पेक्षा जास्त लक्ष्यांक असणाऱ्या बँकांनी कर्ज वाटपाचा रोज आढावा घ्यावा. तसेच पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेत प्रसिद्ध करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले.

बँकांनी कर्ज वाटपाची गती वाढवावी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शंभर कोटी पेक्षा जास्त लक्ष्यांक असणाऱ्या बँकांनी कर्ज वाटपाचा रोज आढावा घ्यावा. तसेच पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेत प्रसिद्ध करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वाटपाची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीला राज्य कृषी मूल्य आयोगाचे नवनियुक्त सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, लिड बँकेचे प्रतिनिधी जगदीश यांच्यासह सर्व बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तिवारी पुढे म्हणाले, जिल्ह्यात केवळ ३० टक्के कर्ज वाटप झाले आहे. ही खेदाची बाब आहे. कर्ज वाटपाची गती वाढविली गेली पाहिजे. कागदपत्रांअभावी कोणत्याही शेतकऱ्याला कर्ज मिळण्यापासून वंचित ठेवू नये. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रा.पं. मध्ये फलक तयार करुन लावण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये दीड लाख पेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी वरील रक्कम भरल्यास शेतकऱ्याला ओटीएस योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम परत मागीतली तर शेतकऱ्यांना ती परत करण्यात यावी. तांत्रिक अडचण दूर झाल्यावर शेतकऱ्यांना पुन्हा रक्कम भरण्यास सांगण्यात यावे असेही यावेळी त्यांनी सांगितले.
भारतीय स्टेट बँक ही कर्ज वाटपात मागे आहे. त्यामुळे या बँकेत असलेले शासनाचे खाते बंद करावेत असे स्पष्ट निर्देश याप्रसंगी किशोर तिवारी यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिलेत.
अन्यथा बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू - नवाल
शासनाच्या कोणत्याही योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर ते कर्ज खात्यात वळते करू नये. वळते केल्यास संबंधित बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबी सर्व बँक अधिकाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.