बॅँकेतील सेवा ठरतात ग्राहकांना डोकेदुखी
By Admin | Updated: November 19, 2015 02:53 IST2015-11-19T02:53:03+5:302015-11-19T02:53:03+5:30
माहिती, तंत्रज्ञान व संगणकीय युगात जलद व उत्तम सेवा मिळावी या दृष्टीने विविध क्षेत्रात अत्याधुनिक यंत्राचा वापर केला जात आहे.

बॅँकेतील सेवा ठरतात ग्राहकांना डोकेदुखी
पुलगाव : माहिती, तंत्रज्ञान व संगणकीय युगात जलद व उत्तम सेवा मिळावी या दृष्टीने विविध क्षेत्रात अत्याधुनिक यंत्राचा वापर केला जात आहे. तसेच आधुनिक प्रणाली विकसित करून वेळ आणि श्रम याचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न असतो. बँक कार्यालयात ग्राहकांकरिता विविध साधने उपलब्ध करून दिली आहे. मात्र येथील भारतीय स्टेट बँक व अन्य बँकेच्या शाखेतील ही साधने बंद अथवा नादुरुस्त असल्याने ग्राहकांकरिता डोकेदुखीचे कारण ठरत आहे.
ए.टी.एम. केंद्र, पासबुक प्रिंटिंग मशीन शाखा कार्यालयात बसविण्यात आले. परंतु सणासुदीच्या काळात ही यंत्रे बंद राहतात. त्यामुळे या सेवेचा ग्राहकांना उपयोग होण्याऐवजी नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गलथान कारभारामुळे खातेधारकांतही तक्रारीचा सूर आहे.
ग्राहकांच्या वेळेचा अपव्यय होवू नये, त्यांना त्वरीत आर्थिक व्यवहार करता यावे. याकरिता विविध राष्ट्रीयकृत बँकांनी येथील बँकेच्या शाखा व रेल्वे स्टेशन येथे एटीएम मशीन बसविली आहे. खातेधारकांना तात्काळ सेवा देण्याचा प्रयत्न केला खरा पण ही एटीएम सेवा सुरळीत सुरू आहे किंंवा नाही हे पाहण्याची गरज मात्र बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांना वाटत नसल्याचे दिसते.
स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत पासबुक प्रिंटीगची मशिन आहे. पासबुकातील नोंदी करून घेतल्यास बँकेचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे करता येईल या भावनेतून सेवा निवृत्तीधारक व ज्येष्ठ नागरिक पासबुक नोंदी करण्यासाठी बँकेत सकाळी १०.३० वाजता पासून रांगेत उभी असतात. मात्र कधी कर्मचाऱ्यांचा अभाव तर कधी तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा बंद असते. या बँकेतील ही सेवा मागील अनेक दिवसांपासून बंद असल्याची खातेधारकांची ओरड आहे. अखेर काही खातेधारक बुधवारी सकाळी ११ वाजता शाखाधिकारी यांचेकडे याबाबत चौकशी करण्याकरिता गेले. मात्र अधिकारी बाहेर गेल्याचे सांगून ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली.
काही विशिष्ट रकमेपर्यंतची राशी एटीएम मधून काढण्याची सूचनाही खातेधारकांना देण्यात येते. ही सेवा ग्राहकांच्या सुविधेकरिता केली आहे. परंतु आधुनिक यंत्रणेचा वापर सर्वच खातेधारकांना करता येणे शक्य नसल्यामुळे अनेकांची तारांबळ उडते. बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी या व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज खातेधारकातून व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)