कर्ज पुनर्गठनासाठी बँकेत रांगा
By Admin | Updated: June 20, 2016 01:59 IST2016-06-20T01:59:10+5:302016-06-20T01:59:10+5:30
शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बियाणे, खते आदी जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करीत आहेत.

कर्ज पुनर्गठनासाठी बँकेत रांगा
शेतकऱ्यांची लगबग : नंदोरी येथील बँक शाखा रविवारीही सुरू
नारायणपूर : शेतीचा हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बियाणे, खते आदी जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करीत आहेत. आतापर्यंत बँक आॅफ महाराष्ट्र शाखा नंदोरीने पुनर्गठण प्रक्रिया सुरू केली नव्हती; पण नव्याने आलेले प्रभारी व्यवस्थापक एस.के. भट्टाचार्य यांनी तीन दिवसांपासून पुनर्गठन प्रक्रियेला वेग दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांचीही गर्दी होत असल्याचे दिसते. सकाळी ८ वाजताच बँकेच्या आवारात शेतकऱ्यांच्या रांगा लागत असल्याचे दिसते.
गतवर्षीचा दुष्काळ लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिले. यामुळे बँकांनी शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाचे हप्ते पाडून देत नवीन कर्ज वाटपास सुरूवात केली होती. असे असले तरी बँक आॅफ महाराष्ट्र नंदोरी येथील कर्ज पुनर्गठण प्रकिया रखडली होती. यामुळे शेतकरीही यासाठी बँकेमध्ये जात नव्हते. तीन दिवसांपूर्वी नंदोरी शाखेत प्रभारी व्यवस्थापक म्हणून एस.के. भट्टाचार्य रूजू झाले आहेत. ते स्वत: बँकेत ९ वाजता येत असून पुनर्गठणाची अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्ज पुनर्गठण प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती होताच शेतकऱ्यांचीही बँकेत गर्दी होत आहे.
परिसरातील खातेदार शेतकरी सकाळी ८ वाजतापासूनच नंदोरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या आवारात रांगा लावताना दिसून येतात. कर्ज पुनर्गठनाची प्रकरणे अधिक असल्याने त्यांनी रविवारीही बँक सुरू ठेवली. व्यवस्थापक सौरभ भट्टाचार्य हे सर्व कर्मचाऱ्यांसह बँकेत कार्यरत असल्याचे दिसून आले. ही पद्धत पुर्वीपासून अवलंबणे गरजेचे आहे. किमान या शाखा व्यवस्थापकांनी प्रक्रिया नियमित व वेगाने करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(वार्ताहर)