लोक अदालतीमध्ये पैसे भरलेल्या शेतकऱ्याला बँकेने केले ‘नादार’
By Admin | Updated: June 14, 2015 02:27 IST2015-06-14T02:27:42+5:302015-06-14T02:27:42+5:30
नापिकी आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेले शेतकरी बँकेचे संपूर्ण कर्ज अदा करू शकत नाहीत.

लोक अदालतीमध्ये पैसे भरलेल्या शेतकऱ्याला बँकेने केले ‘नादार’
भविष्यात कर्ज नाही : व्याज अदा करण्यास तयार असतानाही कर्जास नकारच
अल्लीपूर : नापिकी आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेले शेतकरी बँकेचे संपूर्ण कर्ज अदा करू शकत नाहीत. यामुळे लोक अदालतीमध्ये सेटलमेंट करून कर्ज अदा करतात; पण यानंतर शेतकऱ्यांना बँक नादारीतच काढत असल्याचे दिसते. अशा शेतकऱ्यांना बँकेतून पुन्हा कर्ज दिले जात नाही. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.
पवनी येथील शेतकरी हिरामण बालपांडे यांनी २००९-१० मध्ये भारतीय स्टेट बँक शाखा अल्लीपूरकडून पाच एकर शेतीवर १७ हजार ८०३ रुपये कर्ज घेतले. त्याचा कर्ज खाते क्र. ११७१०९५१८४४ असा आहे. सतत तीन वर्ष नापिकी झाल्याने कर्ज थकित राहीले आणि २३ नोव्हेंबर २०१३ मध्ये बँकेने सदर कर्ज प्रकरणात लोक अदालत हिंगणघाट येथे टाकले. नोटीसी मार्फत १७ हजार ८०३ रुपये मुद्दल व ७ हजार ४७९ रुपये व्याज, असे एकूण २५ हजार २८१ रुपये अदा करा अन्यथा सेटलमेंंट करून मुद्दल भरा, असे कळविले. यावरून शेतकऱ्याने मुद्दल रक्कम अदा केली; पण बँकेने सर्व सेटलमेंट करीत नादार बुडीत कर्जदार म्हणून जाहीर केले. यामुळे सदर शेतकऱ्याला भविष्यात बँकांकडून कर्ज उपलब्ध होणार नाही.
बँकेने भुलथापा देत व कोणतीही माहिती वा भविष्यात कर्ज मिळणार नाही याची सूचना न देता हे सेटलमेंट केले. यात बँकेने माफ केलेले व्याज आणि त्यावरील व्याज, अशी पूर्ण रक्कम अदा करण्यास शेतकरी तयार आहे; पण बँक ती स्वीकारत नाही आणि नवीन कर्जही देत नाही. शिवाय कर्ज निल केल्याचे प्रमाणपत्र देण्यासही बँकेद्वारे नकार दिला जात आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)