कर्ज भरूनही नाहकरत देण्यास बँकेची टाळाटाळ
By Admin | Updated: May 1, 2015 23:59 IST2015-05-01T23:59:17+5:302015-05-01T23:59:17+5:30
नजीकच्या हिवरा (कावरे) येथील ज्ञानेश्वर भाऊराव झोरे या शेतकऱ्याने बँक आॅफ इंडिया शाखा भिडी येथून ट्रॅक्टर व शेतीसाठी कर्ज घेतले होते.

कर्ज भरूनही नाहकरत देण्यास बँकेची टाळाटाळ
शेतकरी अडचणीत : बँक प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे
विजयगोपाल : नजीकच्या हिवरा (कावरे) येथील ज्ञानेश्वर भाऊराव झोरे या शेतकऱ्याने बँक आॅफ इंडिया शाखा भिडी येथून ट्रॅक्टर व शेतीसाठी कर्ज घेतले होते. सदर कर्ज व्याजासहीत भरले असतानाही त्यांना बँक प्रशासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.
सविस्तर वृत्तानुसार, हिवरा (कावरे) येथील ज्ञानेश्वर भाऊराव झोरे यांनी बँक आॅफ इंडिया शाखा भिडी येथून ट्रॅक्टरसाठी रू. ७ लाख व शेतीवरती एक लाखाचे क्रॉप लोन असे एकून आठ लाखाचे कर्ज घेतले. यासाठी त्यांनी आपली हिवरा (कावरे) येथील शेती बँकेला गहाण करून दिली. या कर्जाची परतफेड न झाल्याने त्यावरील व्याज वाढून ते १३ लाखावर पोहोचले. त्यामुळे ही केस लोक अदालत वर्धा येथे पाठविण्यात आली. त्या ठिकाणी काहीही तडजोड न झाल्याने सदर प्रकरण बँकेत परत आले. त्या नंतर बँक मॅनेजर काळे यांनी झोरे यांना बँकेत बोलावून चार जणांसमोर एकमुक्त रक्कम भरण्यासाठी तयार केले. तडजोडीनुसार १० लाख ७५ हजार रुपये १८ मार्च २०१५ भरण्यात आले. पैसे भरल्यानंतर दुपारी ४ वाजता येऊन शेतीवरील नाहरकत प्रमाणपत्र घेऊन जा असे बँक मॅनेजर काळे यांनी झोरे यांना सांगितले. त्यामुळे ठरलेल्या वेळेवर झोरे प्रमाणपत्रासाठी गेले असता त्यांना दुसऱ्या दिवशी या असे सांगण्यात आले. ते दुसऱ्या दिवशी गेले असता त्यांना परत पाठविण्यात आले. तेव्हापासून आजतागायत झोरे यांना नाहरकत प्रमाणपत्रासाठी टाळाटाळ करून अपमानास्पद वागणूक देऊन परत पाठविले जात असल्याचे झोरे यांनी सांगितले. शेती विकून त्यांनी बँकेचे कर्ज भरले. तसेच ट्रॅक्टरही विकला. ज्यांना तो ट्रॅक्टर विकला ते ट्रॅक्टर नावे करून देण्याकरिता किंवा पैसे परत करण्याचा तगादा लावित आहे. परंतु पैसे नसल्याने ते परत कसे करायचे असा प्रश्न पडल्याचे झोरे सांगत आहे.
सेटलमेंट अंतर्गत झोरे यांनी तेरा लाखाचे लोन एका दमात दहा लाख पंचात्तर हजारात नील केले. तसेच एक एक लाखाची त्यांची बँकेत एफडी होती. त्याचे व्याजासहित एक लाख बेचाळीस हजार रुपये झाले. तेही त्या लोनमध्ये जमा केले. म्हणजे दहा लाख पंचात्तर हजार व एक लाख बेचाळीस हजार असे मिळून बारा लाख सतरा हजार रूपये जमा झाले. त्यामुळे त्यांनी पूर्ण कर्ज फेडल्याचे ते सांगत आहे. असे असतानाही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ते अडचणीत आले आहे.(वार्ताहर)
बँकेतील संबंधितांवर कारवाईची मागणी
कर्जाची रक्कम सेटलमेंट अंतर्गत एकहाती भरूनही बँक प्रशासनाकडून ज्ञानेश्वर झोरे यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे झोरे सांगत आहेत. प्रमाणपत्राअभावी त्यांची अनेक कामे अडली आहेत. तसेच प्रमाणपत्रासाठी बँकेत गेले असता त्यांना वारंवार अपमानित केले जात असल्याचे झोरे यांनी सांगितले.
झोरे यांचे प्रकरण मंजुरीसाठी झोनल मॅनेजर नागपूर यांच्याकडे पाठविले असून झोनल मॅनेजरची मंजुरी आल्यानंतर झोरे यांना एन.ओ.सी. देण्यात येईल, असे सांगितले.
-अनिल काळे
बँक व्यवस्थापक,
भिडी