रसायनाने केळी पिकविणाऱ्याला कारावास
By Admin | Updated: August 11, 2016 00:32 IST2016-08-11T00:32:22+5:302016-08-11T00:32:22+5:30
रसायनाचा वापर करून केळी पिकविल्याप्रकरणी एका फळ विक्रेत्यावर अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ अंतर्गत २०१० मध्ये कारवाई करण्यात आली होती.

रसायनाने केळी पिकविणाऱ्याला कारावास
एक हजार रुपयांचा दंड : मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्वाळा
वर्धा : रसायनाचा वापर करून केळी पिकविल्याप्रकरणी एका फळ विक्रेत्यावर अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १९५४ अंतर्गत २०१० मध्ये कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन. माने यांनी आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड तथा दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा सुनावली. हा निर्वाळा सोमवारी देण्यात आला.
अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत इथेपॉन या रसायनाचा केळी पिकविण्याकरिता बंदी असताना वापर करण्यात आल्याचे आढळून आले होते. याबाबत अन्न व औषध प्रशासन वर्धाचे तत्कालीन अन्न निरीक्षक ल.प्र. सोयाम यांना मिळाली होती. यावरून मे. काझी जियाउद्दीन सलाउद्दीन फु्रट मर्चंट व कमिशन एजंट इतवारा यांच्या पेढीस भेट दिली. सदर पेढीचा व्यवहार काझी जियाउद्दीन सलाउद्दीन पाहत असल्याचे आढळले.
अन्न निरीक्षकाने तपासणी केली असता प्रतिबंधीत इथेपॉन रसायनाच्या द्रावणात कच्ची केळी बुडवून त्याचा वेगळा ढीग लावण्यात येत होता. याप्रकारे केळी पिकविण्याची प्रक्रिया होत असल्याचे आढळले. ही बाब लक्षात आल्याने तपासणी अहवाल व पंचनाम्यात नमूद करण्यात आली. केळी व इथेपॉन रसायनाचा नमूना विश्लेषणाकरिता घेण्यात आला. यात इथेपॉन रसायानाचा वापर केल्याचे निष्पन्न झाले होते. केळी पिकविण्याकरिता वापरलेले रसायन इथेपॉन असल्याचेही निष्पन्न झाले. संपूर्ण तपासांती आरोपीविरूद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात २०१० मध्ये दोन प्रकरणे दाखल करण्यात आली.
दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर केळी पिकविण्यासाठी इथेपॉन या रसायनाचा वापर केल्याचे सिद्ध झाले. यावरून विद्यमान मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एन. माने यांनी आरोपी दोन्ही खटल्यात एक वर्ष सश्रम कारावास, एक हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा सुनावली. शासनातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता एस.डी. थूल यांनी युक्तीवाद केला. यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे, एस.पी. नंदनवार यांनी प्रयत्न केले.(कार्यालय प्रतिनिधी)