प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेश मूर्तीवर बंदी
By Admin | Updated: July 29, 2016 02:02 IST2016-07-29T02:02:54+5:302016-07-29T02:02:54+5:30
जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या हद्दीत गणेश उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती

प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेश मूर्तीवर बंदी
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : कुंभार संघटनेची माहिती
वर्धा : जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या हद्दीत गणेश उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती विक्रीकरिता येत असतात. यामुळे प्रदूषण होत असल्याने या मूर्तीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती कुंभार कारागिर एकता संघटनेने दिली.
वर्धा, देवळी, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी या नगर परिषद व समुद्रपूर, सेलू, आष्टी, कारंजा या नगर पंचायतीच्या हद्दीमध्ये गणेश उत्सवाच्या दरम्यान प्लॉस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती बनविणे व विकणे प्रतिबंधीत करावे या मागणीचे निवेदन प्रा. भास्कर इथापे यांच्यासह कुंभार कारागीर एकता संघटनेचे अध्यक्ष अरूण वालदे, सचिव विनोद बोरसरे, सुरेश बोरसरे, सुभाष खांदारे, राकेश चौधरी, संजय खंदारे, प्रभाकर ठाकरे, श्रावण कपाट, शेषराव खांदारे, अजय कपाटे, अशोक कपाट, विजय कपाट, रवी कपाट, उमेश प्रजापती, चंदन प्रजापती, राजकुमार प्रजापती, योगेश प्रजापती यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होते.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्राद्वारे जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायती हद्दीत प्लॉस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती बनविणे व विक्री करण्याबाबत बंदी आदेश दिला अहे. याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने सार्वजनिक, हिताचे महाराष्ट्र शासन व इतर विभागांना प्रतिबंध आणि प्रदुषण नियंत्रण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता निर्देश दिलेले आहे. त्या निर्देशाचे अवलोकन करून प्लॉस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्त्यांवर प्रतिबंध लावण्याची कारवाई करण्याचे पत्र नगरपालिका व नगरपंचायत प्रशासनाने करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास संघटना नगरपालिका व नगर पंचायतीविरूद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल करणार असल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.(प्रतिनिधी)