नाल्याच्या दुतर्फा बांबू आणि चारा लागवड करावी
By Admin | Updated: May 17, 2017 00:33 IST2017-05-17T00:33:55+5:302017-05-17T00:33:55+5:30
जलयुक्त शिवार अभियानात नाला खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. खोलीकरण करताना काढण्यात आलेली माती नाल्याच्या दोन्ही बाजूला

नाल्याच्या दुतर्फा बांबू आणि चारा लागवड करावी
शैलेश नवाल : २०१७-१८ मध्ये १४५ गावांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जलयुक्त शिवार अभियानात नाला खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. खोलीकरण करताना काढण्यात आलेली माती नाल्याच्या दोन्ही बाजूला टाकण्यात येते. ही माती पावसामुळे पुन्हा नाल्यात वाहून जाऊ नये तसेच शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा म्हणून शेताच्या बाजूकडे बांबुची व नाल्याच्या बाजुकडे चारा रोपांची लागवड करावी. यासाठी लागणारी बांबुची रोपे वनविभागाकडून तर गवताचे बियाणे व ठोंबे कृषी विभाग वा कृषी विद्यापीठाकडून मागवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
जलयुक्त शिवार आढावा बैठकीत ते बोलत होते. यासाठी येणारा खर्च प्रत्येक विभागाने आकस्मिक निधीतून करावा. बांबुवरील निर्बंध काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना बांबु लागवडीपासून तीन वर्षांनंतर आर्थिक फायदा होण्यास सुरुवात होते. यासाठी शेतकऱ्यांना केवळ बांबु रोपांची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. गवत लागवडीमुळे शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल. जमिनीची धुपही थांबू शकेल. यामुळे या पावसाळ्यात ज्या-ज्या ठिकाणी नाला खोलीकरण झाले, तेथे दुर्तफा बांबु व गवत लागवड करणे. जलयुक्त शिवारमधील सर्व अंमलबजावणी यंत्रणांना बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.
२०१५-१६ व २०१६-१७ मध्ये निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये झालेल्या कामांतून गावांचा पाण्याचा ताळेबंद पूर्ण झाला की नाही, यासाठी त्रयस्थ विभागांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहेत. यात सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या विभागाने व्यवस्थित सर्वेक्षण केले नसल्यास त्या गावातील शिल्लक काम सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेला पूर्ण करावे लागणार आहे. गाळमुक्त धरण योजनेतून जिल्ह्यातील पाच तलावातील काळ काढण्याचे काम सुरू करावे. यातून निघणारा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचाही या कामात सहभाग घ्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात.
बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, उपवनसंरक्षक दत्तात्रय पगार, लघुसिंचन जि.प. कार्यकारी अभियंता गेहलोत, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी. वाहणे, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे एम.एस. चौधरी तथा तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
१४१.५६ कोटींच्या तरतुदीला मान्यता
जलयुक्त शिवार अभियानात २०१७-१८ मध्ये १४५ गावांची निवड करण्यात आली आहे. यात वर्धा - २२, सेलू -१०, देवळी- २८, आर्वी १७, आष्टी - १६, कारंजा - १८, हिंगणघाट -१९ व समुद्रपूर तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. यात कृषी विभाग- १२११, वन विभाग- ११५०, लघुसिंचन ११०, लघुसिंचन (जि.प)- १००, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा-११२, ग्रामीण पाणी पुरवठा, जि.प.-२२७ अशा एकूण २९१० कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी एकूण १४१ कोटी ५६ लाख ५८ हजार रुयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे. या कामातील दुरुस्ती आणि नाला खोलीकरणाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. वनविभागाने खोल व समतल चर, साठवण तलाव तसेच माथा ते पायथा काम करण्यास प्राधान्य द्यावे.
अन्यथा स्व-खर्चाने करावी लागणार दुरूस्ती
जलयुक्त शिवारच्या २०१५-१६ आणि २०१६-१७ मधील कामांचा आढावा घेताना, दुरुस्तीच्या सर्व कामांना मंजुरी देण्यात येणार आहे; पण त्यांनतर गावातील एकही जुने दुरुस्तीचे काम शिल्लक राहू नये, याची दक्षता घ्यावयाची आहे. जुने काम शिल्लक राहिल्यास त्याची जबाबदारी गावांचे सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेवर राहणार आहे. संबंधित यंत्रणेला स्व-खर्चाने ते दुरुस्तीचे काम पूर्ण करावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.