बामर्डा पूल ठरतोय मृत्यूचा सापळा
By Admin | Updated: August 7, 2016 00:20 IST2016-08-07T00:20:53+5:302016-08-07T00:20:53+5:30
धानोरा मार्गावरील बामर्डा येथील पूल महिन्याभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत खचला व वाहून गेला.

बामर्डा पूल ठरतोय मृत्यूचा सापळा
पुलाचे काम कोण करणार : ग्रामस्थांनी विचारला सवाल, वाहने जाताना बसतात हादरे
हिंगणघाट : धानोरा मार्गावरील बामर्डा येथील पूल महिन्याभरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत खचला व वाहून गेला. सध्या या पुलाच्या उर्वरित भागावरून वाहतूक सुरू असताना पूल हादरतो. या पुलाचे काम कोण करणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
या पुलावरून मार्गक्रमण करताना अपघाताची शक्यता बळावली आहे. पुलावरून वाहने जाताना पूल हादरून मोठा अपघात होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अपघात झाल्यावरच पुलाची दुरूस्ती होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वडनेर ते धानोरा या मार्गावरील बामर्डा येथील अरूंद व जीर्ण अवस्थेतील पुलावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. चंद्रपूर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही भरपूर आहे. यात भाविक रविवारी व बुधवारी वाहनांनी आजनसरा येथे भोजाजी महाराजांच्या मंदिरात दर्शनास येतात. या मार्गाच्या डागडुजीसाठी शासनाचा मोठा निधी खर्च करण्याचे नियोजन आहे. भूमिपूजनही नुकतेच करण्यात आले; पण दोन महिन्यांचा कालावधी लोटत असताना बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही. जीर्ण झालेला बामर्डा गावाजवळील पूल सततच्या पावसाने तुटून वाहून गेला. याकडेही एक महिन्यापासून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
दोन वाहने रात्री या पुलावर आल्यास अपघात निश्चित आहे. शिवाय रहदारीचा रस्ता असल्याने धोका अधिकच वाढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत पुलाची दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)