वाहतूक कोंडीचा बजाज चौक

By Admin | Updated: July 5, 2015 01:09 IST2015-07-05T01:09:14+5:302015-07-05T01:09:14+5:30

बजाज चौक, वर्धा शहरातील मुख्य चौक़ अमरावती, यवतमाळ, चंदपूर सह इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांकरिता शहराचे प्रवेश द्वारच.

Bajaj Chowk of Transport Kondi | वाहतूक कोंडीचा बजाज चौक

वाहतूक कोंडीचा बजाज चौक

रूपेश खैरी/प्रशांत हेलोंडे वर्धा
बजाज चौक, वर्धा शहरातील मुख्य चौक़ अमरावती, यवतमाळ, चंदपूर सह इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांकरिता शहराचे प्रवेश द्वारच. विकासाबाबत सतत दुर्लक्षित असलेले हे प्रवेशद्वार अतिक्रमण व अनियंत्रित वाहतुकीमुळे त्रासदायक ठरू लागले आहे. शहराच्या निर्मितीपासून असलेल्या या चौकाच्या विकासाकरिता ना पालिका ना लोकप्रतिनिधींकडून कधीही पुढाकार घेतल्याचे दिसत नाही.
पूर्वी झाशी राणी चौक म्हणून ओळख असलेल्या या चौकात १९८६ मध्ये जमनालाल बजाज पुतळा लावण्यात आला. त्या काळापासून हा चौक बजाज चौक म्हणून नावारुपास आला. तत्पूर्वी या भागातील पत्रव्यवहार झाशी राणी चौक म्हणून या नावानेच चालत असल्याची माहिती आहे. येथील बसस्थानक आणि रेल्वे स्थानक एकाच ठिकाणी असल्याने या मार्गाला विशेष महत्त्व होते. ते आजही कायम आहे.
शहराच्या नकाशात मुख्य चौक असाच उल्लेख चौकाचा आहे. शहरवासीयांसह बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांकरिता तो महत्त्वाचा आहे. बसस्थानक व रेल्वे स्टेशन याच मार्गावर आहे. या सोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयासह शहर पोलीस ठाणे व वाहतुकीची व्यवस्था सांभाळणारे वाहतूक पोलिसांचे कार्यालयायही येथेच आहे. शिवाय परिसरातील भाजी उत्पादकांना त्यांचे उत्पादन विकण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकार क्षेत्रात येत असलेला बाजारही येथेच आहे. यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्या दृष्टीने असलेली व्यवस्था तोकडी ठरत असल्याने चौकात सतत कोंडी होत आहे.
बसस्थानकावरील बसगाड्यासह खासगी ट्रॅव्हल्स, काळी पिवळी व शहरातून चारही बाजूला प्रवाश्यांना त्यांच्या स्थळी पोहोचविण्याकरिता असलेले आॅटो सतत फिरत असतात. याच चौकातील रस्त्यांच्या कडेलाच आॅटोच्या रांगा लागत असल्याने येथे प्रत्येक अर्ध्या तासात वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे समोर आले आहे. या चौकात वाहतूक पोलीस सतत उभे असले तरी अनियोजित असलेल्या या चौकातील वाहतूक सांभाळणे त्यांच्याकरिता त्रासदायकच ठरत असल्याचे समोर आले आहे.
१२ हजार चौरस फुटाचा परिसर
नगर परिषदेत असलेल्या शहराच्या नकाशानुसार हा चौक एकूण १२ हजार चौरस फूट अशा विस्तीर्ण परिसरात पसरला आहे. असे असले तरी आजच्या घडीला या चौकात अतिक्रमण झाले आहे. शिवाय ठिकठिकाणी अभे राहत असलेले आॅटो, रिक्षा व इतर अवैध वाहनांसह अरूंद ठरत असलेला आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल यामुळे या चौकात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. त्याच्या सोबतीला नियोजनशून्यतेची ओळख देणारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार आहेच.
झाशी राणी चौक झाला बजाज चौक
सध्याचा बजाज चौक कधी काळी झाशी राणी चौक म्हणून अस्तित्वात होता. सन १९८५ मध्ये पालिकेत रमेश शेंडे नगराध्यक्ष असताना ठराव झाला. या ठरावानंतर येथून झाशीच्या राणीचा पुतळा हटवून येथे १९८६ मध्ये जमनालाल बजाज यांचा पुतळा बसविण्यात आला. तर येथील झाशीच्या राणीचा पुतळा मुख्य पोस्ट कार्यालयाजवळ बसविण्यात आला आहे. त्यावेळी बजाज पुतळा लावण्याकरिता बजाज परिवाराकडून पालिकेला पाच लाख रुपये व जलतरण तलाव तयार करण्याकरिता पाच लाख रुपये असे १० लाख रुपये देण्यात आल्याची माहिती पालिकेकडून मिळाली. बजाज पुतळा बसविण्यापूर्वी या भागातील पत्रव्यवहार झाशी राणी चौकाच्या नावाने होत असल्याची माहिती आहे. या चौकातील केवळ पुतळे बदलले मात्र भवितव्य उजळले नाही, असे दिसून येते.
जाहिरातीच्या विळख्यात गिरधर टॉवर
पुतळ्याच्या पूर्वीपासून या चौकात गिरधर टॉवर आहे. शहरातील एक ऐतिहासिक वास्तू असलेला हा गिरधर टॉवर आजस्थितीत जाहिरातींच्या विळख्यात पडला आहे. टॉवरच्या मागच्या बाजूस असलेल्या पेट्रोलपंप धारकाने या टॉवरवर अतिक्रमण केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार जाहिरातीच्या फलकावर पालिकेकडे भरलेल्या रकमेची टोकण रक्कम, त्याचा कालावधी लिहिण्याच्या सूचना आहे. शिवाय या जाहिरातींमुळे टॉवर झाकल्या जात आहे. यामुळे पालिकेच्या विशेष सभेत या टॉवर समोर जाहिराती लावल्या जावू नये, असा ठराव ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Bajaj Chowk of Transport Kondi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.