बाबासाहेबांच्या ‘त्या’ स्मृती देतात अनेकांना प्रेरणा
By Admin | Updated: April 14, 2016 02:48 IST2016-04-14T02:48:48+5:302016-04-14T02:48:48+5:30
देशाच्या स्वातंत्र्यासह मानवतावादाला महत्त्व देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची पहिली चर्चा सेवाग्राम येथे झाली.

बाबासाहेबांच्या ‘त्या’ स्मृती देतात अनेकांना प्रेरणा
तो दगड ठरला भेटीचा साक्षीदार : सेवाग्राम येथे महामानव आणि राष्ट्रपित्याची चर्चा
दिलीप चव्हाण सेवाग्राम
देशाच्या स्वातंत्र्यासह मानवतावादाला महत्त्व देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची पहिली चर्चा सेवाग्राम येथे झाली. या चर्चेत डॉ. आंबेडकर यांनी सेवाग्राम येथील दलित बांधवांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. या गावात जाण्यासाठी सायंकाळ झाल्याने त्यांनी खुल्या मैदानात एका दगडावर बसून समाजबांधवांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. तो दगड आजही येथे कायम असून त्या स्मृती अनेकांना प्रेरणादायी ठरत आहेत.
डॉ. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या दगडाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. शिवाय येथे बसून त्यांनी दिलेला संदेश का फलकावर लिहून तो सर्वांना कळावा, यासाठी हा फलक दर्शनी भागात लावण्यात आला आहे. येथे येणारे या स्थळी प्रेरणा मिळत असल्याचे बोलून दाखवितात. त्या मैदानात उपस्थित गावातील काही नागरिक आजही त्या क्षणाची साक्ष देतात. डॉ. आंबेडकर १ मे १९३६ रोजी सेवाग्राम येथे आले होते. बापुकुटीत महात्मा गांधी यांची भेट घेत त्यांच्यात चर्चा झाली. या गावातील समाज बांधवांमध्ये आपल्या हक्काकरिता लढण्याची जनजागृती व्हावी, यासाठी बाबासाहेबांनी मूळ गावात जाऊन संवाद साधला.
शिक्षणाची कास धरण्याचे केले होते आवाहन
सेवाग्राम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सेवाग्राम या मूळ गावात जाऊन शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन समाजबांधवांना केले होते. ज्या ठिकाणी बाबासाहेब बसले होते, ती जागा व दगड सौंदर्यीकृत करून त्यांच्या स्मृती आजही जोपासल्या जात आहे. महात्मा गांधी दलितांवर होत असलेल्या अन्यायामुळे अस्वस्थ होते. याच काळात डॉ. आंबेडकर यांचा या अन्यायाविरोधात लढा सुरू होता. दोन्ही महात्म्यांचे विचार एक असले तरी काही बाबतीत तात्विक वाद होते. या दोघांत चर्चा व्हावी, या उद्देशाने १ मे १९३६ रोजी जमनालाल बजाज यांनी डॉ. आंबेडकर यांची भेट आश्रमात बापूंशी घडवून आणली. येथील बौद्ध विहाराच्या परिसरातील ही जागा आता समाज बांधवांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाकरिता प्रेरणास्थान बनली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चर्चेचे साक्षीदार पांडुरंग गोसावी, नामदेव गोसावी, आत्माराम ताकसांडे तो क्षण आपल्या डोळ्यांत आजही साठवून आहेत.