बाबा फरीद दर्गाह टेकडीला आग
By Admin | Updated: April 30, 2017 01:03 IST2017-04-30T01:03:37+5:302017-04-30T01:03:37+5:30
येथील बाबा फरीद दर्गाह टेकडी परीसरात आग लागली. या आगीवर ताबा मिळविण्याकरिता तब्बल ८ तास परीश्रम घ्यावे लागले.

बाबा फरीद दर्गाह टेकडीला आग
आठ तासांच्या परिश्रमानंतर आगीवर ताबा : आगीत कुठलीही हानी नाही
गिरड : येथील बाबा फरीद दर्गाह टेकडी परीसरात आग लागली. या आगीवर ताबा मिळविण्याकरिता तब्बल ८ तास परीश्रम घ्यावे लागले. याकरिता गावकरी आणि दोन अग्निशमन बंबामुळे आग आटोक्यात आणणे सोपे झाले. या आगीत कुठलाही जीवित हानी नाही. ही घटना गुरुवारी घडली.
प्राप्त माहीतीनुसार, गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान वनविभागाच्या हद्दीतील टेकडी परिसरात खुर्सापार रस्त्याच्या कडेला आग लागली. ही माहिती गावात पोहचताच युवकांनी टेकडीकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. पहाता पहाता आगीने उग्ररुप धारण केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनाही अपयश आले. घटनेची माहिती पोलीस आणि तहसील कार्यालयाला देण्यात आली. पोलिसांनी याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. या आगीत परिसरातील गवत, झाडे, झुळपांची राख झाली.
यावेळी गिरडचे ठाणेदार बी. डी. मसराम हे आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. घटनास्थळी जिल्हा परीषद सदस्य डॉ महैश गौर, पंचायत समिती सदस्य शेख ईस्राइल, सरपंच चंदाताई कांबळे, उपसरपंच विलास तडस पोहचले. शनिवारी गिरड वनविभाग कार्यालयचे सहायक वनपरीक्षेत्र अधिकारी एम.ओ. राऊत, वनरक्षक वाशिमकर, धारने यांनी घनस्थळ गाठत पंचनामा केला. (वार्ताहर)
अग्निशमन बंबाकरिता पालकमंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप
परिसरात आग लागल्याची माहिती संबंधित प्रशासनाला देण्यात आली; मात्र त्यांच्याकडून बंब पाठविण्याबाबत टाळाटाळ केली. यामुळे येथील युवक अजय इंदुरकर, विलास तडस, नामदेव चुटे, राजू चामचोर, उपसरपंच विजय तडस सरपंच चंदाताई कांबळे यांनी थेट या प्रकाराची माहिती वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली. त्यांनी वेळीच याची दखल घेत प्रशासनाला धारेवर धरले. त्यांची हस्तक्षेप केल्यानंतर हिंगणघाट आणि सिंदी (रेल्वे) येथील अग्निशमन दल पाठविण्यात आले.