बी अलर्ट, एसपी येतील !
By Admin | Updated: June 2, 2014 01:37 IST2014-06-02T01:37:30+5:302014-06-02T01:37:30+5:30
जिल्हा पोलीस आपल्या कर्तव्याबाबत दक्ष आहेत अथवा त्यांच्या

बी अलर्ट, एसपी येतील !
अल्लीपूर : जिल्हा पोलीस आपल्या कर्तव्याबाबत दक्ष आहेत अथवा त्यांच्या कामात कसूर करतात, हे पाहण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रात्री-अपरात्री केव्हाही कोणत्याही पोलीस ठाण्याला भेट देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. यात त्यांनी नुकतीच अल्लीपूर पोलीस ठाण्याला रात्री १२ वाजता भेट दिली. यावेळी कर्तव्यात हयगय करणार्या दोन कर्मचार्यांना दंड करण्यात आला आहे. यामुळे ‘बी अलर्ट, एसपी येतील’ असे म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. पोलिसांच्या नॉन अलर्ट प्रवृत्तीमुळे चोरटे सक्रिय झाले आहेत. आता त्यांच्यावर आळा घालण्याकरिता पोलीस अधीक्षक अलर्ट झाल्याने ठाण्यात नाईट ड्युटी करणार्या कर्मचार्यांवर ‘जागते रहो’ची वेळ आली आहे. जिल्ह्याचा पदभार स्वीकरल्यानंतर काही काळात शांत असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी त्यांच्या कामाला आता प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. रात्री कोणत्या वेळी कोणत्या ठाण्यात त्यांची भेट होईल याचा नेम राहिला नाही. यात त्यांनी नुकतीच रात्री १२ वाजता अल्लीपूर पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी ठाण्यात असलेले जमादार विजय कडू व शिपाई पवन गव्हाळे यांच्या कर्तव्यात कसूर असल्याचे आढळून आले. त्यांना समज देण्याकरिता जिल्हा अधीक्षक कार्यालयात दुसर्या दिवशी हजर राहण्याच्या सूचना देत जिल्हा पोलीस अधीक्षक पुढच्या कार्याला रवाना झाले. हे दोन्ही पोलीस कर्मचारी एसपी कार्यालयात हजर झाल्यावर त्यांना विचारणा करण्यात आल्यावर ते योग्य उत्तर देण्यात असक्षम ठरले. यावरून या दोन्ही कर्मचार्यांना हजार रुपये दंड देत पुन्हा असा प्रकार निदर्शनास आल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे बजावण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या कारवाई मुळे पोलीस विभागात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. रात्र पाळीत कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांनी तर या कारवाईमुळे धसकाच घेतला आहे. सदर कर्मचारी त्यांच्या सहकारी कर्मचार्यांना आता जागते रहो साहेब येताहेत असे म्हणत असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण होऊ लागले आहे. (वार्ताहर)