सुरक्षित मातृत्वासाठी जागृती महत्त्वाची
By Admin | Updated: July 18, 2014 00:17 IST2014-07-18T00:17:56+5:302014-07-18T00:17:56+5:30
प्रसूती हा स्त्रीचा एकप्रकारे पुनर्जन्म असतो. योग्य प्रसूतीसाठी सुरक्षित वातावरण आणि वैद्यकीय सुविधांची नितांत गरज असते. म्हणूनच सुरक्षित मातृत्वाबाबत गावखेड्यापर्यंत जाणीवजागृती करणे

सुरक्षित मातृत्वासाठी जागृती महत्त्वाची
वर्धा : प्रसूती हा स्त्रीचा एकप्रकारे पुनर्जन्म असतो. योग्य प्रसूतीसाठी सुरक्षित वातावरण आणि वैद्यकीय सुविधांची नितांत गरज असते. म्हणूनच सुरक्षित मातृत्वाबाबत गावखेड्यापर्यंत जाणीवजागृती करणे महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे यांनी केले.
सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील हिप्पोक्रेट्स सभागृहात सुरक्षित मातृत्वावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. सी. गोयल, स्त्रीरोग व प्रसूती विभाग प्रमुख डॉ. सी. हरिहरन, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुष्मिता श्रीवास्तव, परिचारिका विभागाच्या संचालक सिस्टर टेस्सी सबास्टियन, डॉ. नीमा आचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सौनेत्रा इनामदार यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. गोयल यांनी गरोदर मातेच्या वैद्यकीय तपासण्यांकडे परिवारातील दुर्लक्ष, प्रसूतीसाठी रुग्णालयाच्या निवडीसंबंधी विलंब, दूर अंतर, वाहनांचा अभाव आदी बाबी टाळण्यासाठी वेळीच योग्य निर्णय घेतला तर प्रत्येक माता आणि मूल सुरक्षित राहू शकते, असा सल्ला दिला. तसेच रुग्णसंपर्क अधिकारी एन. पी. शिंगणे यांनी घरगुती प्रसूती आणि रुग्णालयातील प्रसूती यातील फरक चित्रफितीद्वारे समजावून सांगितला. याप्रसंगी सुरिक्षत मातृत्वदिनानिमित्त अश्विनी अवथळे, सोनू रेणके, शुभांगी चिंचोळकर, श्रद्धा सयाम या स्तनदा मातांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजय ढवळे यांनी केले. संचालन राकेश अगडे यांनी केले तर आभार विनया भरणे-सिन्हा यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता सुलोचना मोहोड, छाया धोंगडे, छाया बोबडे, अजय ठाकरे, मनोज महाजन, जितेंद्र आगलावे, नितेश बुरबुरे तसेच आशा वर्कर्स आणि देवळी, सावंगी फेडरेशन आॅफ आॅब्स्टेट्रिक्स, गायनॅकोलॉजी सोसायटीच्या सदस्यांनी सहकार्य केले. स्त्रीरोगतज्ज्ञांद्वारे गर्भवती मातांची मोफत आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सल्लयानुसार सोनोग्राफी, रक्तचाचणी यासह अन्य तपासण्या करण्यात आल्या.(स्थानिक प्रतिनिधी)