जिल्ह्यातील व्यावसायिकांची कर भरण्याबाबत टाळाटाळ
By Admin | Updated: August 3, 2016 01:02 IST2016-08-03T01:02:44+5:302016-08-03T01:02:44+5:30
जिल्ह्यातील बऱ्याच व्यावसायिकांसह सोसायट्यांनी कराचा भरणा केला नसल्याचे समोर आले आहे

जिल्ह्यातील व्यावसायिकांची कर भरण्याबाबत टाळाटाळ
शासनाची व्यवसाय कर नावनोंदणी अभय योजना
वर्धा : जिल्ह्यातील बऱ्याच व्यावसायिकांसह सोसायट्यांनी कराचा भरणा केला नसल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यात व्यवसायकरांतर्गत अनेक व्यक्ती असताना जिल्ह्यात कराचा भरणा अत्यल्प झाल्याचे समोर आले आहे. अशा व्यावसायिकांकरिता शासनाने व्यवसायकर नावनोंदणी अभय योजना अंमलात आणली आहे.
व्यवसायकर कायद्यान्वये कर भरण्यास पात्र असणाऱ्या ज्या व्यक्तीने नावनोंदणी करून घेतली नाही, किंवा नावनोंदणीसाठी अर्ज केलेला आहे. अशांपैकी काहींचे गत आठ वर्षापर्यंत कराचा भरणा केला नाही अशांना प्रतिदिवस दोन रुपयेप्रमाणे दंड भरावा लागतो. ज्या व्यक्ती नावनोंदणीस पात्र असून नाव नोंदणी धारक नसून व्यवसायकर भरत नाहीत. अशा व्यक्ती व ज्यांनी अजुनपर्यंत नावनोंदणी घेतलेली नाही, अशा व्यक्तीसाठी शासनाने व्यवसायकर नावनोंदणी अभय योजना २०१६ जाहीर केलेली आहे. नावनोंदणी धारकाने प्रमाण वाढविणे व कायद्यानुसार बंधनकारक असणारे व्यवसायकर भरुन घेणे व त्या अनुषंगाने शासनाचा महसूल वाढविणे या हेतुने शासनाने ही योजना आणलेली आहे.
या योजनाचा लाभ घेण्याकरिता नावनोंदणी अर्ज १ एप्रिल २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत करणे आवश्यक आहे. तसेच गत तीन वर्षांचा सुरू आर्थिक वर्ष २०१६-१७ या वर्षाचा व्यवसायकर भरणा करणे अनिवार्य आहे. व्यवसायकर नावनोंदणी अभय योजनेखाली नावनोंदणी घेणाऱ्यास १ एप्रिल २०१३ पूर्वीचे व्यवसायकर व व्याज माफ होईल तसेच व्यवसायकर कायदा कलम ५(५) खाली भरावयाचा दंड सुद्धा होईल. नावनोंदणी करण्याकरिता शासनाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.(प्रतिनिधी)