वेतन अपहार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ

By Admin | Updated: May 27, 2016 01:56 IST2016-05-27T01:56:38+5:302016-05-27T01:56:38+5:30

समुद्रपूर पंचायत समितीमध्ये लिपिकाने केलेला घोळ लेखा विभागाच्या चौकशीत उघड झाला.

Avoid reporting crime in case of wage haul case | वेतन अपहार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ

वेतन अपहार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ

समुद्रपूर पं.स.येथील प्रकार : अधिकाऱ्यांचे मौन शंकास्पद
वर्धा: समुद्रपूर पंचायत समितीमध्ये लिपिकाने केलेला घोळ लेखा विभागाच्या चौकशीत उघड झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या असताना अद्यापही पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली नाही. यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी अनेक हितसंबंधीय सक्रिय असल्याचा संशय बळावत आहे.
समुद्रपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात शिक्षकांचे वेतनाचे काम पाहणाऱ्या लिपिकाचा अपहार उघडकीस आला. हा अपहार कार्यालयाच्या नव्हे तर बॅँक आॅफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सदर घोटाळा उघडकीस आला. प्रारंभी ८ लाख ३० हजार रुपयांच्या जवळपास असलेल्या या अपहारातील रक्कम वाढतच आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या लेखा आणि वित्त विभागाने केलेल्या चौकशीत अपहार झाल्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी सुयोग सुरेश ठाकरे याच्याविरूध्द गुन्हे नोंदविण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परवानगी देऊन १० दिवसापेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्याप गुन्हा नोंदविण्यात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे.
शालार्थ वेतन प्रणालीत शिक्षकांचे वेतन आॅनलाईन केल्या जाते. गत दोन वर्षांपासून समुद्रपूर पंचायत समितीमध्ये सुयोग ठाकरे याच्याकडे शिक्षकांच्या वेतनाचे काम आहे; मात्र ठाकरे या लिपिकास हे काम जमत नसल्याने याच पंचायत समितीमधील एका शिक्षकाकडून तो वेतनाचे काम करून घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे १६ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या या घोटाळ्यात केवळ एकाच लिपिक असणे शक्य नसून वेतनाचे नियमबाह्य काम करत असलेला ‘तो’ शिक्षक सुध्दा पूर्णपणे गुंतला असल्याची पंचायत समिती परिसरात चर्चा आहे. त्यामुळेच सुरुवातीला गटविकास अधिकाऱ्यांनी ठाकरे आणि त्या शिक्षकाचे बॅँक खाते गोठविले होते; मात्र त्या शिक्षकाचे गोठविलेले बॅँक खाते अचानक मोकळे करण्यात आले. यामुळे अनेक संशय निर्माण होत आहे.
अपहार प्रकरण उघडकीस येऊन तीन आठवडे होऊनही अद्याप गुन्हा न नोंदविणे आणि ज्याच्यावर सहआरोपी म्हणून शंका आहे, त्याचे खाते मोकळे करण्याचे कारण शोधून संबंधित अधिकाऱ्यांचा हेतू लक्षात घेण्याची गरज आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत सदस्यांनी हा विषय उपस्थित करून समुद्रपूर पंचायत समितीमध्ये सुरू असलेला गोंधळ बघता कठोर कारवाईची आवश्यकता आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Avoid reporting crime in case of wage haul case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.