कोजागिरीत वर्धेकरांना औरंगाबादचे दूध
By Admin | Updated: October 26, 2015 02:04 IST2015-10-26T02:04:20+5:302015-10-26T02:04:20+5:30
कोजागिरीला दुधाची मागणी अधिक असल्याने बऱ्याच नागरिकांना दुधाकरिता भटकंती करावी लागते.

कोजागिरीत वर्धेकरांना औरंगाबादचे दूध
१५ हजार लिटरचे नियोजन : प्रत्येकाला दूध देण्याचा शासकीय यंत्रणेचा प्रयत्न
रूपेश खैरी वर्धा
कोजागिरीला दुधाची मागणी अधिक असल्याने बऱ्याच नागरिकांना दुधाकरिता भटकंती करावी लागते. यंदाच्या कोजागिरीला नागरिकांची भटकंती होवू नये याकरिता थेट औरंगाबाद येथून १० हजार लिटर दूध येणार असल्याची माहिती आहे. वर्धेतून केवळ जिल्ह्यातच नाही तर नागपूर येथेही दूध पुरविण्यात येणार आहे.
यंदाच्या कोजागिरीला मागेल त्याला दूध देण्याकरिता शासकीय दूध शाळेच्यावतीने १५ हजार लिटर दुधाची व्यवस्था करण्यात आली आहे. गत कोजागिरीला जिल्ह्यात ११ हजार लिटर दूध विकल्या गेल्याची शासकीय नोंद आहे. असे असतानाही बऱ्याच नागरिकांना खासगी कंपनीच्या दुधाचा आधार घ्यावा लागला होता. यंदा मात्र तसे होवू नये याकरिता वाढीव व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात दूध वितरणाच्या शासकीय डेपोवरून दररोज आठ हजार लिटरचे वितरण होत आहे. यामुळे कोजागिरीकरिता नागरिकांना दूध पुरविणे यंत्रणेकरिता कसरतीचे ठरते. याकरिता कोजागिरीच्या दिवसात जिल्ह्यातील संकलन केंद्रातून आलेले अतिरिक्त दूध प्रक्रीया करून ते जपून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रक्रीया केलेले दूध तीन दिवस टिकून राहणे शक्य आहे. यात नवे दूध आल्यानंतर दूध शाळेत प्रक्रीया करून संकलित केलेले दूध ग्राहकांना देण्यात येते. यातून दररोज शिल्लक राहत असलेले दूध कोजागिरीकरिता देण्यात येते. ते कमी पडत असल्याने यंदा औरंगाबाद येथून १० हजार लिटर दुधाची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे.
औरंगाबाद येथील दूध वर्धेत आल्यानंतर त्यावरील प्रक्रीयेअंती पॅकींग करून ते कोजागिरीच्या दिवशी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. वर्धेत यंदाच्या कोजागिरीकरिता नागरिकांना दूध कमी पडणार नसल्याचे शासकीय व्यवस्थेवरून दिसत आहे.